Pune : राज्यातील कृषी विभागाच्या लिपिक संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियुक्तीवरून कामबंद आंदोलन सुरू आहे. बेकायदेशीरपणे पदस्थापना करून शासनानेच शासन निर्णयास बगल दिल्याचा आरोप करत २३ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू असून २६ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू असल्याने कृषी विभागातील कामांना अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, कृषी सहसंचालक (आस्थापना) हे पद लिपीक संवर्गीय प्रवर्गाचे असतानाही शासनाने या पदावर तांत्रिक अधिकारी यांची पदस्थापना केली आहे. यामुळे शासनानेच शासन निर्णयास बगल दिली आहे. कृषी आयुक्तालय पुणे येथील लिपीक पद हे १ मे २०२३ पासून रिक्त असून सेवा शर्ती नुसार या पदावर वरिष्ठ प्रशासन अधिकारी जेष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असतात.
वरील नियमायाप्रमाणे राजेश जाधव (वरिष्ठ प्रशासन अधिकारी) हे कृषी सहसंचालक (आस्थापना) या पदासाठी पात्र असताना सदर पद रिक्त ठेवून त्यांना अप्पर संचालक, वनामती, नागपूर या तांत्रिक पदावर पदस्थापना दिली आहे असा आरोप संघटनेने केला आहे.
शासनाने सेवाशर्तीला बाजूला सारून तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्याला सहसंचालक (आस्थापना) या पदावर पदोन्नती देऊन लिपीक संवर्गीय संघटनेची मागणी फेटाळली आहे. यामुळे लिपीक संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून २३ सप्टेंबरपासून आंदोलन आणि २६ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलंय.
प्रशासकीय पदावर लिपीक प्रवर्गातील अधिकाऱ्याऐवजी तांत्रिक पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याला आमचा विरोध असून आम्ही कामबंद आंदोलन करत आहोत. - अशोक काळे (राज्य सरचिटणीस, कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना)