Join us

शेतकऱ्यांनो उसाचे पाचट जाळू नका! कुजवा अन् खतातून असा मिळवा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 5:15 PM

उसाचे पाचट कुजवा, खतातून फायदा मिळवा

दौंड तालुका हा ऊसाचे आगार म्हणून ओळखला जातो. ऊसाचे एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी ऊसाचे पाचट न जाळता ते शेतात कुजवून जमिन सुपिकता व ऊस उत्पादन वाढवता येते. ऊसाच्या पाचटात ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्केस्फुरद, ०.७ ते १ टक्के पालाश, ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. त्यामुळे पाचट जाळल्यास त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णतः नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्के हून अधिक भाग जळून जातो. केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते.

एक हेक्टर क्षेत्रातून आठ ते दहा टन पाचट मिळत असून त्यातून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ टन सेंद्रीय कर्ब जमिनीत जाते. ऊस तोडणीनंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे केल्यास त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे कोंब जोमदार येतात. उसाचे मोठे बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटणीनंतर लगेचच ०.१ टक्के बाविस्टीन या बुरशी नाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे.

शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक खत सम प्रमाणात टाकून ऊसाला पाणी देणे गरजेचे आहे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून घेतल्यास पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. ऊस तुटल्यानंतर उसाचे पाचट शेतामध्येच कुजवून जमिन सुपीकता व खोडवा ऊस उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. पाचटामुळे पाणी व वीज बिलात बचत होते, तण नियंत्रण करता येते.

सुपीकता वाढुन प्रदूषण घटते

जमिन सुपीकता वाढुन उत्पादनात वाढ होते. तसेच प्रदूषण घटते.त्यामुळे पाचट व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग यांच्या समन्वयाने पाचट व्यवस्थापनाबाबत गेल्या पाच वर्षापासून करत असलेल्या जनजागृतीमुळे दौंड तालुक्यात बहुतांश शेतकरी पाचाट न जाळता ते शेतातच कुजवत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊसखते