सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाने मान घातल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धुळीला मिळाली आहे. अगदी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडेनासा झाला आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण तरीही हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. खरीप हंगामातील काढणी अवस्थेतील पिके कापणी करुन शेडमध्ये किंवा पाऊस लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावी.
नवीन बहार धरलेल्या फळपिकांमध्ये रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव होवू शकतो, त्याकरीता आवश्यक ती फवारणी तज्ञांच्या सल्लयाने करावी भाजीपाला पिकामध्ये करपा रोगाचा व किडीमध्ये रस शोषण करणारी थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव होवू शकतो. त्याकरीता कार्बनडाझिम १ ग्रॅम, वायोमिथोक झाम ०.३ ग्रॅ. प्रति लीटर पाणी घेवून फवारणी करावी. या काळात पिकांमध्ये वातावरणीय बदलामुळे ताण दिसून येत आहे. पिकांमध्ये दिसून येणारे बदल पाहून त्या अनुषंगाने खताचा वापर तज्ञांच्या सल्लयानुसार करावा.
आंबा पिकामध्ये नविन पालवी व मोहोराकरीता किड नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड १७.८ एसएल या किटकनाशकाची ३ मिली प्रति १० लीटर पाणी घेवुन पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. ढगाळ वातावरण व पावसाचे वातावरण यामुळे कांद्यावर करपा रोग व फुलकिडीचा प्रादुभार्व रोखण्यासाठी टेब्युकोनॅझोल १० मिली अधिक डायमिथोएट १० इसी १५ मिली प्रति १० लीटर पाण्यात घेवून पावसाची उघडीप व अंदाज पाहून फवारणी करावी. शेती व शेतीसबंधित निगडीत उद्योगधंदे यासंबंधित अधिक माहितीसाठी कृषिक अॅप प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करावे. शेतीसंबधित माहिती जाणून घ्यावी.
अशी घ्यावी काळजी
पावसाची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे. शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे, तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून घ्यावी.
तत्काळ करा काढणी
पिकाची काढणी व मळनीची कामे तत्काळ उरकून घ्यावी. कापणी व मळणीच्या कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टरद्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे. कापणी झाली असल्यास व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा. कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.
(शब्दांकन : प्रशांत ननवरे)