नाशिक : यंदा मागील वर्षीपेक्षा पावसाने (Rain) चांगली हजेरी लावल्याने जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या हंगामी पीक पैसेवारीमध्ये जिल्ह्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांहून अधिक आली आहे. त्यामुळे सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर (Drought) जिल्ह्यात यंदा चांगले पीक येण्याचा अंदाज आहे, तर दुसरीकडे पैसेवारीचा विचार केल्यास शासकीय मदतीच्या कक्षेतून जिल्हा बाहेर पडला आहे.
गेल्या वर्षी अल निनोमुळे मान्सूनने (Monsoon) जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती. वार्षिक सरासरीच्या ४० टक्क्यांच्या आसपास पर्जन्य तूट आली होती. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ३९९ टैंकर ऑगस्टअखेरपर्यंत सुरू होते. मालेगाव, येवला व सिन्नरसह तब्बल ५६ महसुली मंडळांमध्ये आधीच दुष्काळ घोषित करण्यात आला होता. यंदा मात्र पावसानेही सरासरी ओलांडल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. पाण्याची कमतरता नसल्याने पिकांची लागवड चांगली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने २०२३-२४ ची खरीप आणि रब्बी पिकांची जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. या यादीत १९६२ गावे ५० पैशांवर आहेत. प्रशासनाकडून आता पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाला सादर होणार नाशिक जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी दरवर्षी १५ सप्टेंबरला जाहीर केली जाते. खरीप पिकांची पैसेवारी तीन वेळा जाहीर केली जाते.
१५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी
दरम्यान १५ सप्टेंबरला नजर अंदाज, ३१ ऑक्टोबरला सुधारित पैसेवारी आणि १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. पिकांची पैसेवारी काढण्यासाठी, प्रत्येक गावात प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडले जातात. गावांच्या शिवारात, एकूण पेरलेल्या वा लागवडीखालील एकूण क्षेत्रफळाच्या ८० टक्क्यांपर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात.