नाशिक : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी बंद पडलेले व अतिक्रमित वहिवाट रस्ते उपयोगात आणण्यासाठी ४२ दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे ग्रामीण रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत व अनेक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
वर्षानुवर्षे न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच, ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला ग्रामीण शिवार (Shiwar Raste) रस्त्यांचा प्रश्न मार्गी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात वहिवाट, हद्दीचे रस्ते, गाडीवाट, पायवाट, पाणंद, शेत व शिवार रस्ते मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र अतिक्रमण, कुटुंबांचे झालेले विभाजन व वादातून बंद पडलेल्या रस्त्यांची संख्या मोठी आहे.
सिन्नर तालुक्यात महसूल विभागाकडे १०० प्रकरणांवर दावे सुरू आहेत; तर १०० प्रकरणांवर तक्रारी आहेत. असेच स्वरूप इतरही तालुक्यांत आहे. कित्येक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे न्यायासाठी चकरा मारण्याची वेळ आली आहे. तथापि या ४२ दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचा वर्षानुवर्षी रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.
असा आहे ४२ दिवसांचा उपक्रम
- २० ते २४ डिसेंबर : तलाठ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून गाडीवाट, पायमार्ग नमूद असलेले नकाशे प्राप्त करणे
- २४ ते २६ डिसेंबर : रस्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणे.
- २७ ते ३१ डिसेंबर : बंद असलेले रस्ते ज्यातून जातात, त्या भोगवटाधारकांची यादी तयार करणे.
- १ ते ५ जानेवारी : भोगवटधारक, सरपंच व इतर सहधारकांची रस्ता खुला करण्यासाठी बैठक व तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह वादग्रस्त स्थळांचे निरीक्षण करून बैठक घेणे व सहमतीने रस्ता खुला करणे.
- ६ ते १५ जानेवारी : रस्ता खुला न झाल्यास भूमी अभिलेख कार्यालयाकडून रस्ता निश्चित करून तो पोलिसांच्या साहाय्याने खुला करणे.
- १६ ते ३१ जानेवारी : त्यानंतर रस्ता खुला न झाल्यास तहसीलदार महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार अर्ज प्राप्त करून घेऊन कार्यवाहीद्वारे रस्ता खुला करणार आहेत.
बंद पडलेले वहिवाट रस्ते खुले करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाला प्रतिसाद न दिल्यास पोलिस, भूमी अभिलेखाच्या साहाय्याने रस्ते खुले करण्यात येणार आहेत. हा उपक्रम व्यापक स्वरूपाचा व अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा आहे.
- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर