Join us

Agriculture News : शेतकऱ्यांनो! कुणी लाच मागितली तर 'हे' लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 4:10 PM

Agriculture News : कधी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तर कधी पीक कर्ज काढताना बँकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून पैशाचा तगादा लावला जातो.

Agriculture News : अनेकदा सरकारी योजना राबवत असताना शेतकऱ्यांना अधिकारी वर्गाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कधी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी (Agriculture Scheme) तर कधी पीक कर्ज काढताना बँकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून पैशाचा तगादा लावला जातो. मात्र आता अशी प्रकरणे थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) जाणार असून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबत अहमदनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढाकार घेतला आहे. 

नुकताच अहमदनगर (Ahmednagar) शहरात शेतकरी जागृती मेळावा पार पडला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पोलीस अधिकारी ऋतुजा जाधव यांनी अशा प्रकरणांबाबत शेतकऱ्यांना अवगत केले. एखाद्या योजनेचे अनुदान मिळण्याबाबत असो किंवा बँकेकडून लोन  घेण्याबाबत अशा प्रसंगी शेतकर्यांकडून लाच मागण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी. थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी जाधव यांनी केले. तसेच सरकारी , सहकारी खात्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, अडचणी, अडवणूक, फसवणूक होऊच नये यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

लाच घेणे व देणे कायद्याने गुन्हा असताना देखील लाचेची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. यात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या बळीराजाला देखील अशा घटनांना सामोरे जावे लागते. कृषी विभागामार्फत अनेक योजना सुरु असतात. शेतकरी कागद जमा करून अर्ज करतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांना फेऱ्या माराव्या लागतात. अधिकारी वेगळी कारण सांगतात. मग अचानक पैशांची मागणी केली जाते. मगच योजनेचे पैसे टाकतो, असे सांगितले जाते. अशावेळी शेतकरी हतबल होऊन अधिकाऱ्याच्या हाती पैसे टेकवतो. 

तात्काळ संपर्क करा... 

तसेच अनेकदा शेतकरी खरीप हंगामाच्या (Kharif Season) सुरवातीला बँकाकडून कर्ज घेत असतात. अनेकदा या ठिकाणी देखील अशा प्रसंग उदभवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा, असे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डलाचलुचपत प्रतिबंधक विभाग