Pik Vima Yojna : महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी २०२३-२४ या हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. या पूर्वी अनेक वेळा मागणी करण्यात आलेली आहे तसेच आंदोलने ही केलेली आहेत. आता पुन्हा स्वतंत्र भारत पक्षांसह इतर शेतकरी संघटनांनी कृषी आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्यानुसार येत्या ०९ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील असंख्य शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
सन २०२३-२४ सालच्या खरीप व रब्बी हंगाममधील नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. संबंधित विमा कंपनी व जिल्हा कृषी विभागातील अधिकाऱ्याऱ्यांनी अनेक वेळा पैसे अदा करण्याच्या तारखा जाहीर केल्या, प्रसंगी लेखी दिले आहे. मात्र पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालेले नाही. पुढील पिकांच्या देखभालीसाठी पैशाची अत्यंत गरज आहे. मात्र अनेकवेळा आंदोलन, निवेदने देऊनही यावर काहीच तोडगा निघत नसल्याने आता मोर्चाचा अवलंबला जाणार आहे.
विमा कंपन्यांना केंद्र व राज्य सरकारांनी वेळेत पैसे न दिल्यामुळे ही दिरंगाई होत आहे, असे विमा कंपन्या सांगतात. सबब आपण संबंधित मंत्रालयाशी संपर्क करून तातडीने शेतकऱ्यांना पैसे अदा करण्याची व्यवस्था करावी. विम्याचे पैसे एक आठवड्यात न मिळाल्यास, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी, दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालपावर, स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल . या मोर्चात पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येईल. तरी आपणास विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम व्याजासहित शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी, असे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. अनेकवेळा स्थानिक पातळीवर आंदोलन करूनही आश्वसनाशिवाय काहीच मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरू केलेले हे आंदोलन आता राज्यव्यापी आंदोलन झाले आहे. त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी कृषी आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. सकाळी सात वाजता अमरावती - पुणे या रेल्वे ने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी पुणे येथे जाणार आहेत, सर्व शेतकरी बांधवानी यात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे.