Join us

Agriculture News : नाफेड खरेदी अमळनेरऐवजी एरंडोल शेतकी संघ करणार, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:34 PM

Agriculture News : धान्याच्या खरेदीसाठी अमळनेर शेतकी संघाला डावलून अमळनेरसाठी एरंडोल शेतकी संघाची निवड करण्यात आली आहे.

जळगाव : नाफेड अंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन (Soyabean) धान्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील अमळनेर शेतकी संघाला डावलून अमळनेरसाठी एरंडोल शेतकी संघाची निवड करण्यात आली आहे. यामुळे अमळनेरातील शेतकऱ्यांना आता धान्य विक्रीसाठी एरंडोल गाठावे लागणार आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांवर १० ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 

अमळनेर तालुक्यातील (Amalner) उडीद,  मूग, सोयाबीन खरेदीसाठी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी १ ऑक्टोबर रोजी अण्णासाहेब मुरलीधर गंगाराम पाटील फळ व भाजीपाला खरेदी व विक्री सोसायटी, चांदसर यांच्या नावाचे आदेश जारी केले होते. मात्र लगेचच ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात अमळनेरची खरेदी एरंडोल शेतकी संघाला देण्यात आली. खरेदीसाठी ऑनलाइन नावनोंदणी मार्केट यार्ड, अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे कळवण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्याचे खरेदीचे काम एरंडोल शेतकी संघ करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बैंक पासबुक झेरॉक्स व चालू वर्षाचा सन २०२४/२५ खरिपाचा ऑनलाइन मूग, उडीद व सोयाबीन नोंदणी केलेला सातबारा उतारा, ही कागदपत्रे अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ जमा करावीत, असे कळवण्यात आले आहे.

निर्णयाबाबत आश्चर्य 

यावर्षी हमी भाव मूग रु. ८६८२ रुपये, उडीद रु. ७४०० रुपये, सोयाबीन रू. ४८९२ रुपये एवढा आहे. "या मालाची खरेदी डी. एम. ओ. गोडाऊन अमळनेर येथील गोदामात करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे. तर या निर्णयानंतर शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अमळनेर शेतकी संघ काळ्या यादीत नाही तरी का वगळण्यात आले, याबाबत आश्चर्य वाटत आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजळगावअमळनेर