नागपूर : विदर्भाचा विकास करायचा असेल तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढवावा, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे.
विदर्भाचा विकास करायचा असेल तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढवावा. याचा उपयोग ऊस पिकात केल्यास एकरी उत्पादन वाढू शकते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पीडीकेव्ही, दाभा येथील मैदानात सुरू असलेल्या ॲग्रो व्हिजनमध्ये दुसऱ्या दिवशी 'ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान' या विषयावरील कार्यशाळेत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे, शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, अजय झाडे, आनंदराव राऊत, अनिल मेंढे, फुलके, पद्माकर वैद्य, अनिल भुजाडे, छाया जोशी, सय्यद, जांभूळकर उपस्थित होते.
गडकरी यांनी सांगितले की, उसाचे पैसे ताबडतोब मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी असते. तयार साखर लगेच विकली जात नसल्याने पैसे मिळायला उशीर होतो. इथेनॉल आणि अल्कोहोल तयार करीत असल्याने यातून येणारे पैसे देता येतात.
बांबू, उसाचे फड यांच्यापासून ऑर्गेनिक कार्बन तयार करता येतो. विदर्भामध्ये ऊस उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. प्रास्ताविक आनंदराव राऊत, संचालन जयंत ढगे, तर अनिल मेंढे यांनी आभार मानले.
'माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर' या विषयावरील चर्चासत्रात गडकरी म्हणाले की, कल्पना खूप असतात. त्यावर संशोधन करून तंत्रज्ञानही विकसित करता येते. पण, गरज आधारित संशोधन, उपयुक्त तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि बाजाराची मागणी पूर्ण करणाऱ्या उत्पादनाची देशाला अधिक गरज आहे.
तरुणाईने शेतीसोबत गावे समृद्ध करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी 'तरुणांचा शेतीतील सहभाग' या विषयावरील कार्यशाळेत केले. तरुणांनी कृषी प्रदर्शनांमधील नवीन तंत्रज्ञाकडून प्रेरणा घेऊन गावामधील शेतीचा विकास करावा, शेती समृद्ध झाली की गावेदेखील समृद्ध होतील. गडकरी यांनी ग्रामीण भागातील ३० टक्के लोकसंख्या शहराकडे वळती झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
तरुण देशाचे भविष्य असून ज्ञान ही त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे. ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करण्याची ताकद तरुणाईमध्ये असून त्यांनी नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावे, असे आवाहन केले.