Join us

Agriculture News :  कल्पकता आणि नावीन्यपूर्ण विचार म्हणजे 'काऊ फार्मस'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 11:31 AM

Agriculture News : माफसू येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.

विदर्भातील दुधाचे संकलन ५० लाख लिटर होणे आवश्यक आहे. त्यासाठी २० लिटर दूध देणाऱ्या १० हजार गायी विदर्भात असणे आवश्यक आहे. विदर्भात सार्वजनिक लोकसहभागातून (पीपीपी मॉडेल) 'काऊ फार्मस्' तयार झाल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यादृष्टीने तज्ज्ञांची मदत घेऊन पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे 'दुग्ध व्यवसाय-उपजीविका आरोग्य आणि पोषणाचे माध्यम' या विषयावर नागपूर येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे शनिवारी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी 'माफसू'चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, नॅशनल डेअर डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन डॉ. मीनेश शाह, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (पशू विज्ञान) डॉ. राघवेंद्र बट्टा, भारतीय दुग्ध व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष आर. एस. सोधी व्यासपीठावर उपस्थित होते.

गडकरी यांनी काऊ फार्मची संकल्पना मांडतानाच पीपीपी मॉडेल वापरण्याची सूचना केली. 'पीपीपी मॉडेलच्या जोरावर आज मी देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकतोय. मोठे महामार्ग, रस्ते, टनेल्स होत आहेत. कल्पकता आणि नावीन्य वापरले, अस्तित्वात असलेल्याच पायाभूत सोयीसुविधा वापरल्या तर अधिक प्रभावीपणे 'काऊ फार्म'चा प्रकल्प यशस्वी करता येईल, असेही गडकरी म्हणाले. चांगल्या प्रजातीच्या दुधाळू गायी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, हा काऊ फार्मचा उद्देश असावा, असेही ते म्हणाले.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवावे लागेल. एकेकाळी ९० टक्के लोक ग्रामीण भागात राहायचे. आता २५ टक्के लोकांचे स्थलांतर झाल्यामुळे गावात राहणाऱ्यांची, संख्या कमी झाली आहे. खेडोपाडी शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवावे लागेल. उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय नफा वाढणार नाही, हे समजावून सांगणे आवश्यक आहे.  

टॅग्स :शेती क्षेत्रगायशेतकरीशेती