Agriculture News :
पाथरुड तालुक्यात यावर्षी वेळेवर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप व रब्बी पिकांबरोबरच काही प्रमाणात कांदा पिकाकडेही वळत आहेत.
यामुळेच सध्या कृषी निविष्ठा दुकानांमध्ये कांदा बियाण्यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
भूम तालुका तसा खरीप हंगामाचे कोठार म्हणून ओळखला जातो; परंतु गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात कांदा लागवडीकडे वळले आहेत.
यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने तालुक्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.
कांदा लागवड करायची झाल्यास त्याच्यासाठी लागणारे रोप हे शेतात बियाणे स्वरूपात टाकावे लागते व त्यापासून तयार झालेल्या रोपची पुढील दीड ते दोन महिन्यांत लागवड केली जाते; परंतु काही शेतकरी रोप न घेता थेट बियाणे टाकून कांद्याची लागवड करतात.
यामुळेच सध्या कांद्याच्या बियाण्याला कृषी दुकानांमध्ये शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा बियाणांमध्ये दरवाढ झाली आहे.
गेल्यावर्षी काही कंपन्यांचे कांदा बियाणे १ हजार ५०० ते १ हजार ६०० रुपये प्रतिकिलो होते, यावर्षी ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ही दरवाढ शेतकऱ्यांचा खिसा मोकळा करणारी ठरत आहे.