Agriculture News :
यवतमाळ : अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे पीक परिस्थिती नाजूक अवस्थेतून जात आहे. अशा परिस्थितीत महसूल यंत्रणेकडून जिल्ह्याच्या नजर पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
यामध्ये ६० टक्क्यांच्या वर जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे पीक परिस्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा या अहवालातून सादर झाला आहे.
दरवर्षी पीक परिस्थितीचा अंदाज जाहीर करण्यासाठी पैसेवारी जाहीर केली जाते. यावरून पिकांची परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज येतो. प्रथम नजर पैसेवारी जाहीर करण्यात येते.
३० सप्टेंबर रोजी ही नजर पैसेवारी यंत्रणेकडून जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील दोन हजार ४६ गावांमध्ये पीक पैसेवारी ६० टक्के निघाली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पैसेवारी असेल तर पीक परिस्थिती चांगली आणि ५० टक्क्यांपेक्षा खाली अहवाल असेल तर परिस्थिती खराब, असा त्याचा अर्थ असतो.
परंतु नजर पैसेवारीमध्ये जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे कुठलेही समीकरण दिसत नाही. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली आणि परतीच्या पावसाने नुकसान होत असताना अहवालामध्ये मात्र या बाबी दिसल्या नाहीत.
यामुळे पीक परिस्थिती उत्तम असल्याची बाब अहवालातून नमूद करण्यात आली आहे. महसूल यंत्रणेकडे याबाबत नजर सर्वेक्षण करण्याचे काम असताना कर्मचाऱ्यांकडून नजर सर्वेक्षण करताना पिकांच्या एकूण स्थितीचे बारकावे घेतल्या गेले नाही.
यामुळे पिकांची स्थिती खराब असतानाही अहवाल मात्र उत्तम आला आहे. विशेष म्हणजे, १६ ही तालुक्यांमध्ये पिकांची परिस्थिती नाजूक आहे. कपाशीला पातेगळ आणि रस शोषक किडींमुळे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर सोयाबीनवर येलो मोझॅक नावाचा व्हायरस आक्रमण करून गेला आहे.
यामुळे वेळेपूर्वीच सोयाबीन करपले आहे. यामध्ये शेंगांमध्ये दाणे भरलेच नाहीत. सोयाबीनचा उताराही घटण्याचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत पीक परिस्थिती चांगली कशी म्हणता येईल? हाच खरा प्रश्न आहे.
सततच्या पावसाने तुरीचे पीक जळाले आहे. एक लाख हेक्टरपैकी ४० हजार हेक्टर तूर करपली. यानंतरही पीक परिस्थिती चांगली आहे, असे म्हणणे कितपत योग्य? असा प्रश्नही शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.
पैसेवारी न काढलेल्या गावांची संख्या
जिल्ह्यात ११३ गावांमध्ये महसुली दर्जा नसल्याने या ठिकाणची पैसेवारी निघाली नाही. जिल्ह्यात सर्वाधिक २२ गावे उमरखेड तालुक्यातील आहेत. यवतमाळ १७, घाटंजी १५, केळापूर ११, झरी जामणी ११, कळंब २, बाभूळगाव ७, आर्णी ५, दिग्रस १, पुसद ४, महागाव ३. राळेगाव १, वणी ७,मारेगाव ७.
अशी आहे नजर पैसेवारी
तालुका | पैसेवारी (टक्के) |
दिग्रस | ६८ |
मारेगाव | ६४ |
वणी | ६३ |
कळंब | ६० |
आर्णी | ६० |
नेर | ६० |
केळापूर | ६० |
राळेगाव | ६० |
झरी | ६० |
उमरखेड | ५९ |
बाभूळगाव | ५८ |
दारव्हा | ५८ |
महागाव | ५७ |
यवतमाळ | ५४ |
पुसद | ५४ |