Join us

Agriculture News : जळगाव जिल्ह्यात ज्वारी खरेदीची 'ही' दहा केंद्रे बंद, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 7:10 PM

Agriculture News : नवीन हंगामाची ज्वारी काही दिवसांत शेतकऱ्यांच्या घरात येईल, मात्र गेल्या हंगामातील ज्वारी अजूनही विक्री होऊ शकलेली नाही. 

जळगाव : शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदीची (Sorghum Market) मुदत फक्त आठ दिवस शिल्लक असताना अजूनही बारदान आणि गोदाम उपलब्ध नसल्याने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील १८ पैकी १० ज्वारी खरेदी केंद्र अद्याप बंदच आहेत. नवीन हंगामाची ज्वारी काही दिवसांत शेतकऱ्यांच्या घरात येईल, मात्र गेल्या हंगामातील ज्वारी अजूनही विक्री होऊ शकलेली नाही. 

कापूस आणि ज्वारी या दोन्ही पिकांचा भाव गडगडल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. शासनाकडून आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्याला यंदा १ लाख ८८ हजार ९७६ क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट दिलेले आहे. तर ३ लाख क्विंटल ज्वारीची नोंद झालेली आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त प्रमाणात ज्वारी शेतकऱ्यांकडे आहे. राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने ज्वारी खरेदी केली जाते. 

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक संजय पवार यांनी ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.  तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन गोदामअभावी बंद असलेले खरेदी केंद्र सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तातडीने गोदाम उपलब्ध करून केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत

ही केंद्र आहेत बंद अमळनेर, पारोळा, चोपड़ा, एरंडोल, जामनेर, शेंदुर्णी व पाचोरा ही केंद्र बारदान अभावी बंद आहेत, तर पाळधी, बोदवड व भडगाव ही केंद्रे गोदाम अभावी बंद आहेत.  गोदाम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे, तर बारदान पुरविण्याची जबाबदारी अन्न व पुरवठा विभागाची आहे. म्हसावद येथे केंद्र मंजूर असताना ते चिंचोली येथे गैरसोयीच्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुदतीत ज्वारी खरेदी झाली नाही, तर कवडीमोल भावात ते व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहे, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

जळगाव जिल्ह्यात १८ पैकी १० केंद्र बंद आहेत. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. गोदाम अभावी बंद असलेली तीन केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. सात ठिकाणी बारदान पुरवावे व खरेदीला एक महिना मुदतवाढ द्यावी, म्हणून शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे.  - संजय पवार, संचालक, राज्य मार्केटिंग फेडरेशन

टॅग्स :शेती क्षेत्रज्वारीशेतीमार्केट यार्ड