Join us

Agriculture News : विद्यापीठातील प्राध्यापक करणार बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास; शेतकऱ्यांना होणार फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:27 PM

राज्यातील बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक करणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांना नवीन माहिती मिळणार आहे. (Agriculture News)

Agriculture News

राम शिनगारे : छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक आता राज्यातील बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास करणार आहेत. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) त्याविषयीच्या प्रस्तावाला मान्यता देत तब्बल ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

येत्या पाच वर्षात हा संशोधन प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये कार्यरत प्राध्यापक संशोधनासाठी निधी मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. 

त्यामध्ये विज्ञान विद्याशाखेतील प्राध्यापकांना यश मिळते. मात्र, सामाजिकशास्त्र विद्याशाखेतील प्राध्यापकांना मोठ्या रकमेचे प्रकल्प मिळत नसल्याचेच आतापर्यंत समोर आलेले आहे. मात्र, विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदन सूर्यवंशी यांनी नांदेड, धुळे आणि कोलकाता येथील प्राध्यापकांच्या मदतीने 'आयसीएसएसआर' कडे महाराष्ट्रातील बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. 

त्याची चार पातळ्यांवर पडताळणी झाल्यानंतर मंजूर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावानुसार राज्यातील प्रत्येक विभागातून एक जिल्हा अभ्यासासाठी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 

या प्रकल्पाचे डॉ. मदन सूर्यवंशी हे प्रमुख असणार आहेत, तर त्यांना नांदेड येथील डॉ. पराग खडके, धुळ्याचे डॉ. डी. एस. सूर्यवंशी आणि कोलकाता येथील डॉ. विश्वजीत चौधरी हे सहकार्य करणार आहे. सामाजिकशास्त्रे विद्याशाखेत एवढ्या मोठ्या किमतीचा प्रकल्प पहिल्यांदाच मिळाल्याचा अंदाजही प्राध्यापकांनी व्यक्त केला.

कशाचा करणार अभ्यास

• या प्रकल्पामध्ये बदलते पीक प्रारूप, नगदी पिकांची वाढ, खाद्यान्न व चारा पिकांचा अभाव, शेतीवर पडणारा सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभावाचा अभ्यास केला जाणार आहे. 

• त्यातून शेतीपुढील आव्हाने, प्रादेशिक आणि आर्थिक विकास, माती, पाणी हवामान, शेतकऱ्यांचे जीवनमान आदींची माहिती पुढे येणार असल्याचे संशोधक डॉ. मदन सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठ संशोधक प्राध्यापकांच्या पाठीशी

विद्यापीठातील डॉ. मदन सूर्यवंशी यांच्यासारखे प्राध्यापक संशोधनात अग्रेसर आहेत. सतत मेहनत घेऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रशासन म्हणून आम्ही अशा संशोधक प्राध्यापकांच्या पाठीशी आहोत. या प्रकल्पांमधूनच विद्यापीठाची प्रगती होत असते. -डॉ. वाल्मिक सरवदे, प्र-कुलगुरू

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती