Join us

Agriculture News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कधी? खात्यात मात्र रुपयाही आला नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 2:45 PM

नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानाची मदत मिळणार तरी कधी? याची वाट शेतकरी पाहात आहेत. (Agriculture News)

राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ ते एप्रिल २०२४ पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानापोटी वाशिम जिल्ह्यातील ११ हजार ८०९ बाधित शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ३२ लाख ९६ हजार रुपयांचा निधी २ ऑगस्टच्या निर्णयान्वये मंजूर केला.

तथापि, महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, शेतकऱ्यांनाही ई- केवायसी करावी लागणार आहे.

वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने सात हजार हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या पीक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची मागणी केली होती. तथापि, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत ही मदत अडकून पडली होती. त्यानंतर नवी लोकसभाही अस्तित्वात आली. 

अखेर राज्य शासनाने २ ऑगस्ट रोजी राज्यात जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी वितरणास मंजुरी दिली. 

यात वाशिम जिल्हयात फेब्रुवारी ते मे दरम्यान पीक नुकसान झालेल्या ११ हजार ८०९ बाधित शेतकऱ्यांसाठी २१ कोटी ३२ लाख ९६ हजारांच्या निधीचा समावेश आहे. तथापि, अद्याप बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. प्रशासनाने त्वरित कार्यवाही पूर्ण करुन खात्यात मदतीची रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

किती गावांना बसला फटका?

जिल्ह्यात फेब्रुवारी ते एआय इमेज एप्रिलदरयान वारंवार अवकाळी पाऊस झाल्याने एकूण २०७ गावांना फटका बसला. त्यात मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि कारंजा तालुक्यातील गावांमधील ११ हजार ८०९ शेतकऱ्यांच्या शेतामधील फळपिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डीबीटी पोर्टलवर शासन निर्णयाला विलंब

राज्यशासनाने जानेवारी ते एप्रिलदरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानापोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी मंजूर केल्याचा निर्णय २ ऑगस्ट रोजी जाहीर केला. तथापि, हा शासन निर्णय डीबीटी पोर्टलवर अपलोड होण्यास मोठा विलंब लागला.  मागील आठवडाअखेर हा शासन निर्णय डीबीटी पोर्टवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु झाले.

ग्रामपंचायतस्तरावर लावणार याद्या!

बाधित शेतकऱ्यांच्या याद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर या याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड केल्या जाणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पडताळणीसाठी या याद्या ग्रामपंचायतस्तरावर प्रकाशित करण्यात येणार आहे. यादीमधील आपले नाव शोधून आधार क्रमांक, बँक खात्याची पडताळणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यात त्रुटी करण्यासाठी ई- केवायसीही करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या खात्यात रक्कम जाम होणार आहे.

कोणत्या तालुक्यातील किती बाधितांना प्रतीक्षा?

मालेगाव  ६३८
मंगरुळपीर७४०४
कारंजा १८३०
मानोरा  १९३३
वाशिम  ०४
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपैसाकृषी योजना