दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. " हो हो, चालेल... मी साखर संकुलातच आहे, तुम्हाला वेळ असेल तेव्हा या" असं म्हणत सरांनी बाईट साठी बोलावलं होतं. रात्री व्हाट्सअपवर मेसेज केल्यानंतर सकाळी सरांशी पुन्हा फोन झाला. ठरल्याप्रमाणे दोन बाईट शूट केल्या आणि सर म्हणाले, 'आपण एक फोटो घेऊया...' दोन दिवसापूर्वीचा हा फोटो सरांसोबतचा शेवटचा फोटो ठरला. काल अचानक सरांचे निधनाची बातमी कळाली आणि धक्का बसला. त्यांची अशी अकाली एक्झिट मनाला न पटण्यासारखी आहे.
कृषी पत्रकारितेला सुरूवात केल्यापासून अनेक लोकांना भेटलो, बोललो आणि मुलाखतीही घेतल्या. पण शेतमाल निर्यातीविषयी काहीही असलं तरी नाव समोर यायचं ते गोविंद हांडे सरांचं. अनेकांकडून यांचे रेफरन्स यायचे. सरांना केवळ तीन-चार वेळाच भेटलो. पण मी पूर्णवेळ कृषी पत्रकारिता करत असल्याचं सांगितल्यावर त्यांनी मला बरेच कानमंत्र दिले. त्यांचा स्वभाव शांत, मितभाषी, सामावून घेणारा, समजावून घेणारा होता.
शेती आणि शेतकऱ्यांविषयी खरी तळमळ असणारे अधिकारी म्हणजे गोविंद हांडे. निवृत्तीनंतरही ते अविरतपणे काम करत होते. पण कधी आपण एवढ्या मोठ्या पदावर काम केल्याचा गर्व त्यांच्या वागण्यात दिसला नाही. अगदी साधा, सरळ, प्रामाणिक माणूस. त्यांना भेटलं की, कृषी क्षेत्रात काम करण्याची नव्याने ऊर्जा मिळायची. पण परवाची त्यांची शेवटची भेट ठरली... त्यांच्या जाण्याने कृषी क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झालीये.
भावपूर्ण आदरांजली... 🙏💐- लोकम अॅग्रोचे प्रतिनिधी दत्ता लवांडे यांचा अनुभव