प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची व्यापकता वाढवण्यासाठी राज्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम आयोजित केले असून अंमलबजावणीच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी, जिल्हा संसाधन व्यक्ती यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. सर्व ग्रामसभांमध्ये कृषी सहायक योजनेची प्रचार प्रसिद्धी करतील. इच्छुक, पात्र व सक्षम लाभार्थींच्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन ती माहिती जिल्हा संसाधन व्यक्तीकडे १५ ते ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्यात येईल.
मंजुरीस्तव प्रकल्प आराखडे सादर केलेल्या बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली असून लाभार्थींच्या कागदपत्रांची बँक अधिकाऱ्यांसमक्ष पडताळणी करून त्रुटींची पूर्तता करण्यात येणार आहे. जिल्हा संसाधन व्यक्ती सर्व लाभार्थींचे सविस्तर प्रकल्प आराखडे (डीपीआर) तयार करून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांमार्फत विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाइन प्रस्ताव बँकेकडे कर्ज मंजुरीस्तव सादर करतील. याबाबत संबंधित तालुका कृषी अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी संनियंत्रण करतील.
जिल्हास्तरावरील प्रस्ताव प्रलंबित असणाऱ्या बँक, संबंधित कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, बँक शाखा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल व त्याचे संनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने करणार आहेत.