Join us

Agriculture Scheme : राज्य शासनाची योजना; किती कृषिपंपधारकांना होणार फायदा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 3:21 PM

राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून त्याचा फायदा किती कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणार आहे. (Agriculture Scheme)

राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकरी ग्राहकांचे तब्बल ४६ कोटी रुपयांचे वीजबिल माफ केले जाणार आहे.

शेतीला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने अनेक शेतकरी कृषिपंपाचा वापर करतात. या कृषिपंपांना महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेती उत्पादनामध्ये कृषिपंपांचा महत्त्वाचा वाटा आहे.

 शेतकऱ्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना जाहीर केली आहे. २५ जुलै २०२४ रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे. 

त्यानुसार ७.५ अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचे धोरण शासनाने राबविले आहे.  ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजे मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे या योजनेअंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये हिंगोली जिल्हयातील ७.५ एचपीच्या कृषि पंप ग्राहकांचे ४६ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली.

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहेच. मात्र अनेक भागात दिवसा वीजपुरवठा खंडित असतो. तो सुरु ठेवावा अशी मागणी होत आहे.

१७१ कोटींचे वीज देयक

■ महावितरण कंपनीकडून दर तीन महिन्याला कृषिपंपधारकांना वीज दिली जाते. त्यात औंढा नागनाथ तालुक्यातील १२ हजार ३५९ कृषिपंप ग्राहकांना २४.७४ कोटी, वसमत तालुक्यातील २१ हजार २९२ ग्राहकांना ३८.१६ कोटी, हिंगोली तालुक्यातील १२ हजार ७२० ग्राहकांना २७.७६ कोटी, कळमनुरी तालुक्यातील १४ हजार २०१ ग्राहकांना ३६.५८ कोटी आणि सेनगाव तालुक्यातील १५ हजार ९९४ कृषिपंप ग्राहकांना ३४.०८ कोटी असे एकूण ७६ हजार ५६६ कृषिपंप ग्राहकांना १७१ कोटी ३२ लाख रुपयांचे वीजबिल दिले आहे.

■ या योजनेअंतर्गत ४६ कोटी रुपयांचे वीजबिल माफ होणार असल्याची माहिती महावितरणने दिली.

कोणत्या तालुक्यात किती कृषी पंपधारक?

औंढा नागनाथ१२३५९
वसमत२१२९२
हिंगोली१२७२०
कळमनुरी१४२०१
सेनगाव१५९९४
एकूण    ७६५६६
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनावीजशेतकरीशेती