पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी केली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची गोडी लागण्यासाठी अभ्यासक्रमातून हा विषय शिकवला जाणे महत्वाचे असून या निर्णयामुळे शेतीविषयक उदासिनता दूर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कृषी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करताना केसरकर म्हणाले, "राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबई जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी असेही सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 5 डिसेंबर रोजी राज्यात “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाचा शुभारंभ करणार आहेत."
राज्य सरकारने २०२१ मध्ये शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (MSRTC) आणि महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद (MCAER) यांना संयुक्तपणे अभ्यासक्रमाची रचना करण्यास सांगितले होते.
भारत हा कृषीप्रधान देश असूनही शालेय व माध्यमिक शिक्षणात कृषी विषय नाही याची खंत विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) २०१७ च्या अहवालात व्यक्त केली होती. अन्य विद्याशाखांच्या तूलनेत कृषी शाखेत शिक्षण घेण्याचा कल कमी आहे. कृषी अभ्यासक्रमाचा उद्देश लक्षात घेऊन शाळेत शेती शिकवल्याने कृषी स्वयंरोजगाराला चालना मिळून ग्रामीण शहरी दरी कमी होण्यास मदत होऊ शकेल असे दोन वर्षांपूर्वी सांगण्यात आले होते.
कृषीची रूजवणूक शाळेपासूनच...
- गोष्टी कशा वाढतात, जगतात आणि मरतात याचे ज्ञान शाळेतील विद्यार्थ्यांना असले पाहिजे. या विषयाद्वारे त्यांना फुलांपासून बटाट्यापर्यंत, गायी आणि डुकरांपासून ट्रॅक्टर आणि मातीपर्यंत सर्व काही शिकता येईल, त्यांना शेतीविषयक कामांची जाणीव करून देऊन त्यांच्या टेबलवर अन्न कसे मिळते, कपडे स्टोअरच्या कपाटात आणि बियाणे कसे येतात याचे ज्ञान त्यांना मिळेल.
- आज शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाशी क्वचितच संबंध लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांना कृषीचे ज्ञान शाळेतच मिळाले तर शेती विषयाचे महत्व त्यांच्या मनावर ठसविले जाऊन शेती विषयाची जाण असणारी पिढी निर्माण होईल. मातीशी पुन्हा नाळ जोडली जाईल. ग्रामीण भागात कृषी बांधिलकी निर्माण करून शेतकरी समाजाप्रती सामाजिक बांधिलकी निर्माण होईल.
- सध्याची जागतिक स्पर्धा आणि माहितीच्या जगात ग्रामीण भागातील बहूसंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे दहावी नंतर शिक्षण घेणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना या विषयाचे ज्ञान तर शेती व शेती विषयाचे ज्ञान शाळेतच मिळाले तर शेती व शेतीशी संलग्न व्यवसाय अधिक कुशलतेने करून त्याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते.
- विद्यार्थ्यांना जीवनउपयोगी ज्ञान मिळाल्याचा आनंद मिळेल. कृषी ज्ञानातून इस्राइलसारख्या वाळवंटात केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करता येते आणि हा शेतमाल जगभरात पुरवला जातो, हे सर्वांनाच माहीत आहे. पण महाराष्ट्रासाठी शेती उत्पादन संशोधनात प्रगती करण्यासाठी येणाऱ्या काळात हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.