Agro Advisory : डिसेंबर महिन्यात हवामानात(weather)सतत्याने बदल होताना दिसले. कधी थंडीचा(cold) जोर वाढला तर कधी अवकाळी पावसाने(rain) हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे(Crop) नियोजन(Mangement) करताना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.
या आठवड्यात हवामानानुसार पिकांचे नियोजन कसे करावे यासंदर्भात मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील चार दिवसात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्यिअसने कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या ५ दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची तर पुढील चार दिवसात किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात येत्या ३ ते ९ जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापनकापूस : कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पुर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
तुरी : उशीरा पेरणी केलेल्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% ४.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५% ३ मिली किंवा इंडाक्झाकार्ब १४.५% ८ मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५% ८ मिली किंवा ल्युफेन्यूरॉन ५.४% १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
ज्वारी : रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू : पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र १०९ किलो युरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी देऊन आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
मका : वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल १०% ईसी १० मिली किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबीन ५% डब्ल्यू जी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
द्राक्ष बागेत ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पीक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
बदललेल्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी. थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळ्या जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी; वाचा आजचा IMD रिपोर्ट