प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील ७ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात उत्तर भागात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील ७ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात उत्तर भागात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १३ फेब्रुवारीपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व १४ ते २० फेब्रुवारीदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करता येते. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० % ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद : हळद पिकाची काढणी करण्यापूर्वी १५ दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
हरभरा : हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
हरभरा : हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना ५ % निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५% - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.
करडई : उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
तीळ : उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा २.५ ग्रॅम थायरम किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस २० मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे.
फळबागेचे व्यवस्थापन
तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक ५ ग्रॅम + चिलेटेड आयर्न ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% एससी ४ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २०% एससी २० मिली किंवा सायपरमेथ्रीन १०% ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी गॅलर्डिया फुल पिकाची लागवड करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेस वराह किंवा वन्य प्राण्यांकडून त्रास होत असेल तर जिल्ह्यातील वन परीक्षेत्र अधिकारी यांच्या नुकसान भरपायीसाठी अर्ज करणे आवश्यक त्यासाठी अर्जासोबत १) जमीनीचा 7/12 नोंद २)आधार कार्ड ३) 8-अ ४) पीक पेरा आदी कागदपत्रे जोडून https://mahaforest.gov.in/ या पोर्टलवर नुकसानीबाबत फोटो शक्य असेल तर देणे.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात होत असलेल्या वाढीमुळे जनावरांवर होणारा ताण कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लिव्हर टॉनिक व जीवनसत्वे आहारातून द्यावेत.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)