कोल्हापूर : हे कसलं तांदूळ म्हणायचं, पाण्यावर तरंगतयं आणि पाखडले की उडतंय, दिसायला तर प्लास्टिकच जणू... रेशन दुकानातून यंदा मिळालेल्या तांदळाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. अनेकांनी हे तांदूळ बाजूला काढले आहेत. पण हे तांदूळ बाजूला काढणे किंवा टाकून देणे ही मोठी चूकच असणार आहे.
नागरिकांमधील विशेषतः महिलांमधील पोषणमूल्यांची कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने साध्या तांदळामध्ये हे फोर्टिफाइड तांदूळ मिसळले आहेत. त्यामुळे हे तांदूळ आवर्जून खाणे गरजेचे आहे.
स्वस्त धान्य दुकानातील तांदळामध्ये अनेकदा हे फोर्टिफाइड तांदूळ मिसळलेले असतात. हे तांदूळ तांदळाच्या पिठापासून आणि पोषणमूल्ये घालून बनवले गेलेले असल्याने ते पॉलिश्ड असतात. त्यामुळे ते प्लास्टिकसारखे दिसतात.
काय आहे फोर्टिफाइड तांदूळ?
हा तांदूळ तांदळाच्या पिठापासूनच बनवला जातो. तांदळाच्या पिठात व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ए, आयर्न, फॉलिक अॅसिड, झिंक ही पोषणमूल्ये घातली जातात व त्यांची कारखान्यामध्ये निर्मिती केली जाते. भात हा आवडीने व चवीने खाल्ला जाणारा पदार्थ असल्याने या पोषणतत्त्वांच्या फोर्टिफाइड मिश्रणाला तांदळाचा आकार देण्यात आला.
फोर्टिफाइड तांदळाचे फायदे
• बालकांमधील कुपोषण कमी करतो.
• गर्भवती व स्तनदा मातांना विशेष उपयोगी असून, त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारते.
• डोळ्यांची दृष्टी सुधारते.
अनेकजण हा तांदूळ मूळ तांदळातून काढून ठेवतात किंवा टाकून देतात. पण असे करणे म्हणजे आपल्या शरीराला उपयुक्त असणारी पोषणमूल्ये काढून टाकण्याचा प्रकार आहे.
बाजारात ७५ रुपये दर
सर्वसामान्यांना हा तांदूळ प्लास्टिकचा किंवा भेसळयुक्त वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यामध्ये सर्वाधिक पोषणमूल्ये असल्याने याचा दर सर्वसामान्य तांदळापेक्षा जास्त आहे. बाजारपेठेत, ऑनलाइवर हा तांदूळ किमान ७५ रुपये किलोने विकला जातो. आरोग्याबाबत अधिक जागरूक असलेले लोक या तांदळाला प्राधान्य देतात.
तरंगतो आणि उडतो
तांदळाच्या पिठात ही पोषणमूल्य घालताना त्यातील ही मॉइश्चर (पाण्याचा अंश) काढून टाकल्याने हा तांदूळ वजनाला हलका असतो. त्यामुळे पाण्यावर तरंगतो आणि पाखडले की उडतो. हळूहळू पाणी शोषून घेतो. शंभर किलोमागे साधारण एक ते दोन किलो असे त्याचे प्रमाण आहे.
बाजारात ७५ रुपये दर
सर्वसामान्यांना हा तांदूळ प्लास्टिकचा किंवा भेसळयुक्त वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यामध्ये सर्वाधिक पोषणमूल्ये असल्याने याचा दर सर्वसामान्य तांदळापेक्षा जास्त आहे. बाजारपेठेत, ऑनलाइवर हा तांदूळ किमान ७५ रुपये किलोने विकला जातो. आरोग्याबाबत अधिक जागरूक असलेले लोक या तांदळाला प्राधान्य देतात.
गरिबातील गरीब कुटुंबातील व्यक्तींमधील पोषणमूल्यांची कमतरता भरून निघावी, यासाठी हा फोर्टिफाइड तांदूळ स्वस्त धान्य दुकानाद्वारे घराघरापर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे नागरिकांनी गैरसमज न बाळगता हा तांदूळ आवर्जून खाल्ला पाहिजे. - मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी