बारामती : 'एआय' तंत्रज्ञनाचा वापर करून शेतीच्या अडचणीवर येथील कृषी विज्ञान केंद्रात काम सुरू आहे. त्यामुळे उसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल, असे मत अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने 'एआय' तंत्रज्ञनावर आधारित ऊसशेती विकसित करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग 'गेमचेंजर' ठरणार आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, सिईओ डॉ. निलेश नलवडे, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, वाढत्या लोकसंख्येनुसार व सातत्यपूर्ण पारंपरिक शेती पद्धतीच्या वापरामुळे दरडोई शेती खालील सुपीक जमिनीचा ऱ्हास होत आहे. महाराष्ट्र राज्यातील ओलिता खालील सुपीक शेत जमिनीचा मोठा वाटा हा ऊस शेतीत मोडतो.
ऊस शेतीतील भविष्यातील संधी पाहता इथेनॉल चलीत वाहनांच्या निर्मितीवर नजीकच्या काळात फार भर देण्यात येत आहे व ती काळाची गरज देखील आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आर्टिफिशियल ट्रस्ट, बारामती इंटेलिजन्सच्या वापरावर ३ वर्षांपासून सहकार्याने संशोधन केले आहे.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. कृषी तंत्रज्ञानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरातील १००० शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शेतीमध्ये हा प्रयोग राबविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित ८०० शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्व व सुरू हंगामामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.
राज्यात ऊस उत्पादनातून मिळणारे उत्पन्न ३०,००० ते ३५,००० कोटी आहे. 'एआय' तंत्रज्ञनाच्या वापरामुळे ३० टक्के उत्पादनामध्ये वाढ मिळणारे उत्पन्नात ४५,००० कोटी वाढ अपेक्षित असल्याचे पवार म्हणाले.
'एआय' आधारित प्रयोगाला 'प्राधान्य' देणार
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉ. नीलेश नलवडे यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या 'प्लॅटफॉर्म मुळे कृषी क्षेत्रावर ७ 'लेक्चर' देण्याची संधी मिळाली. 'युके'च्या पंतप्रधानांनी 'एआय' आधारित प्रयोगाला 'प्राधान्य' देणार असल्याचे घोषित केले आहे.