पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान झपाट्याने विविध क्षेत्रात विकसीत होताना दिसत आहे. तर या तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सोपे झाले आहेत. कृषी क्षेत्रही या तंत्रज्ञानापासून दूर राहिले नसून ड्रोन, वेदर स्टेशन, सॅटेलाईट अशा वेगवेगळ्या गोष्टी कृषीम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विकसीत होताना दिसत आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत येणाऱ्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानांतर्गत तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे देशातील पहिले फुले अमृतकाळ हे महत्त्वपूर्ण ॲप विकसित केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने सन २०२० मध्ये कृषि महाविद्यालय, पुणे येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र चालू केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गीर, सहिवाल, राठी, थारपारकर व लाल सिंधी या पाच गोवंशांवर एकाच ठिकाणी तुलनात्मक संशोधन केले जात आहे.
सध्याच्या जागतिक तापमान वाढीच्या व हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र सरासरी तापमानामध्ये वाढ तर आद्रतेमध्ये चढ उतार अनुभवायला मिळत आहेत. तापमान व आर्द्रता हे दोन्ही हवामानातील घटक जनावरांबरोबर सर्वच सजीवांच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. सध्याच्या विपरीत हवामान परिस्थितीमध्ये उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरांच्या आरोग्य विषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
या परिस्थितीमुळे प्रजननामध्ये अडचणी निर्माण होऊन सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे हे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. यावरच तोडगा म्हणून या संशोधन केंद्रामध्ये काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानांतर्गत शास्त्रज्ञांनी तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे देशातील पहिले फुले अमृतकाळ हे महत्त्वपूर्ण ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे पशुधन व्यवस्थापनाकरीता इंटरनेट ऑफ थिंग्स व कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर साध्य केला आहे.
या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यातील स्थानिक व रोज बदलणाऱ्या दैनंदिन वातावरणीय परिस्थितीमध्ये जनावरांमध्ये उष्णतेमुळे किंवा थंडीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी सल्ले देण्याची सोय आहे. सदरील ॲप सर्व शेतकऱ्यांना मोफत वापरता येणार आहे. जनावरांच्या गोठ्यामध्ये फॅन किंवा फॉगर सुरू करण्याबद्दल सूचना किंवा स्वयंचलित पद्धतीने फॅन किंवा फॉगर सुरु करणे अशा गोष्टीसुद्धा ॲपच्या माध्यमातून करता येतील. हे ॲप वापरून शेतकरी त्यांच्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेऊन नियमित उत्पादन मिळवू शकतील. तंत्रज्ञान वापराच्या प्रमाणानुसार ॲपची तीन मॉडेल विकसित करण्यात आली आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू मा. कर्नल डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले की या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला जगाच्या पाठीवर कुठूनही स्वतःच्या गोठ्यातील जनावरांवरील उष्णतेचा ताण ओळखणे शक्य होणार आहे. असे केल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या दुभत्या गुरांची दूध उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे.
मुंबई येथे बुधवार, दि. ६ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांचे शुभहस्ते फुले अमृतकाळ या तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणाऱ्या ॲपचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे मा. श्री. नरेंद्र दराडे आमदार, विधान परिषद व सदस्य, कार्यकारी परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, मा. श्री. शेखर मुंदडा, अध्यक्ष, गोसेवा आयोग व श्री. अनूप कुमार, अपर मुख्य सचिव, कृषि हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू मा. कर्नल डॉ. पी. जी. पाटील असतील.
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प कार्यरत आहे. विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर ॲप लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांच्या पुढाकारातून सदर ॲप तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे तांत्रिक प्रमुख तथा प्राध्यापक डॉ. धीरज कंखरे, डॉ. विष्णू नरवाडे, सहयोगी प्राध्यापक तथा पशुवैद्यकीय अधिकारी, डॉ. महानंद माने, प्रमुख, सिंचन व्यवस्थापन विभाग व डॉ. सुनील कदम, सहयोगी प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी या शास्त्रज्ञांचा संशोधनामध्ये सहभाग आहे.