Pune : शेती क्षेत्रातील व्यवसायांना आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. त्यामध्येच कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत २ कोटी मर्यादेपर्यंतच्या योजने अंतर्गत पात्र सर्व कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) कर्जावर वार्षिक ३ टक्के व्याज सुट देण्यात येते. या योजनेंतर्गत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्र राज्याला सलग दोन वर्षे केंद्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
दरम्यान, या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ उद्योगांना आणि व्यवसायांना जास्तीत जास्त ७ वर्षापर्यंत घेता येणार आहे. तसेच पात्र कर्जधारकांसाठी सुक्ष्म व लघु उद्योजक योजनेच्या पत हमी निधी ट्रस्ट अंतर्गत २ कोटी पर्यंतच्या कर्जासाठी या वित्त पुरवठा सुविधेतुन पत हमी संरक्षण उपलब्ध आहे, या संरक्षणाकरीता लागणारे शुल्क शासनामार्फत भरण्यात येते.
शेतकरी उत्पादक संस्थेकरीता कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, विभागाच्या अधिनस्त असलेल्या लघु कृषक कृषि व्यापार संघामार्फत राबविण्यात येणा-या पतहमी योजनेचा लाभ घेता येतो.
महाराष्ट्रासाठी वर्ष २०२५-२६ पर्यंत एकूण ८ हजार ४६० कोटीचा लक्षांक आहे. महाराष्ट्रात ८ डिसेंबर २०२४ पर्यंत ९ हजार २३४ प्रकल्पांनी या योजनेचा लाभ घेतला असून यासाठी ६ हजार ७१३ कोटी रूपयांची मंजूरी मिळाली आहे. लाभ मिळालेल्या दिनांकापासून पुढील सात वर्षे कर्जाच्या व्याजावर सलवत मिळणार आहे. महाराष्ट्राने एकूण लक्षांकाच्या ७९ टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे.