Join us

अकाेल्याच्या कृषी विद्यापीठाने केले सूर्यफुलाचे नवे वाण विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 8:00 AM

सूर्यफुलाची पेरा वाढविण्यावर भर देण्यात आला असून, केंद्र शासनाने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यासाठीचा एक संशाेधन प्रकल्प दिला आहे.

राज्यात सूर्यफुलाची पेरा वाढविण्यावर भर देण्यात आला असून, केंद्र शासनाने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यासाठीचा एक संशाेधन प्रकल्प दिला आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाने भरघाेस उत्पादन देणारे सूर्यफुलाचे नवे वाण विकसित केले आहे.

सूर्यफुलाचे तेल आर्थिकदृष्ट्या सामान्यांना परवडणारे असून, आराेग्यवर्धक आहे. म्हणूनच पूर्वी शेतकरी सूर्यफुलाची शेती करीत हाेते. परंतु, आता बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफूल पेरणी कमी केली आहे. याच अनुषंगाने केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयाने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला एक संशाेधन प्रकल्प दिला आहे. यामध्ये तेलबिया पिकांवर संशाेधन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे असा यामागील उद्देश आहे.

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही तत्पूर्वी सन २०१७ मध्ये पीडीकेव्ही एसएच-९५२ हे सूर्यफुलाचे हायब्रिड वाण विकसित केलेले आहे, परंतु या वाणाची मर्यादा केवळ विदर्भापुरती हाेती. यामुळे कुलगुरू डाॅ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात संशाेधन करून पीडीकेव्ही-९६४ या नावाचे नवे वाण या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. सूर्यफुलाचे हे वाण यावर्षी संपूर्ण राज्यासाठी प्रसारित करण्यात आले आहे. सद्या या वाणाचे बिजाेत्पादन घेण्यात येत आहे.

हेक्टरी २४ क्विंटल उत्पादनअकाेल्याच्या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीडीकेव्ही-९६४ या सूर्यफूल वाणापासून हेक्टरी २२ ते २४ क्विंटल उत्पादन मिळणार असल्याचा दावा तेलबिया संशाेधन केंद्राच्या संशाेधकांनी केला आहे़. पेरणी खर्च १० ते १५ हजार रुपये लागताे. सद्या सूर्यफुलाला प्रतिक्विंटल ५,६०० रुपये भाव आहे. यातून शेतकऱ्यांना हेक्टरी ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळू शकते, असेही संशाेधकाचे म्हणणे आहे.

सूर्यफुलाचे तेल आर्थिकदृष्ट्या सामान्यांना परवडणारे आहे. या अनुषंगाने काम सुरू आहे तेलबिया पिकांचा प्रसार व पेरणी वाढावी यासाठीचा प्रकल्प शासनाकडून मिळाला आहे. - डाॅ. संताेष गहूकर, विभागप्रमुख, तेलबिया संशाेधन केंद्र, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकाेला.

टॅग्स :पीकपीक व्यवस्थापनअकोलाशेतकरी