अलिबाग येथील वेगळी ओळख असणारा पांढरा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. तो पुढील आठवड्यात बाजारात विक्रीस येणार आहे. यंदा अडीचशे हेक्टरवर त्याची लागवड करण्यात आली आहे.
दरवर्षी पाच हजार मेट्रिक टन उत्पादन या कांद्याचे घेतले जाते. अलिबाग-वडखळ रस्त्यावर लवकरच कांदा विक्री करणारे स्टॉल दिसू लागणार आहेत.
अलिबाग तालुक्यातील नेहूली, खंडाळे, वेश्वी, वाडगाव, तलवली, धोलपाडा, सागाव, कार्ले, रूळे, पोवळे या गावात पांढरा कांद्याची शेती केली जाते.
यंदा पावसाळा लांबल्याने या कांद्याची पेरणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आली होती. बदललेल्या वातावरणाचा फटका बसेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कांद्यावर कोणताही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही.
अलिबामध्ये अडीचशे हेक्टर क्षेत्रावर या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा कृषी विभागाने कांद्याचे लागवड क्षेत्र पुढील वर्षी वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
शेतकऱ्यांना बी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित केले होते. त्यामुळे कांद्याचे बियाणे तयार करण्यात आले असून पुढील वर्षी लागवड क्षेत्र वाढले जाणार आहे.
२५० हेक्टरवर पांढरा कांद्याची लागवड करण्यात आली होती. ही शेती आता बहरली आहे. काही दिवसांतच तो बाजारात विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
लहान माळ दोनशे ते अडीचशे रुपये?
शेतात पांढरा कांदा तयार झाला असून शेतकऱ्यांकडून काढणीला वेग आला आहे. शेतातून काढलेला कांदा घरी आणून तो सुकविण्यासाठी ठेवला आहे. पात्या सुकल्यानंतर कांद्याच्या माळा बांधण्याची लगबग सुरू झाली आहे. कांद्याच्या माळा तयार करून त्या विक्रीस ठेवल्या जाणार आहेत.
भौगोलिक मानांकन मिळालेले उत्पादन
लहान माळ दोनशे ते अडीचशे रुपये तर मोठी माळ तीनशे ते साडेतीनशे रुपयांनी विक्रीस ठेवली जाणार आहे. पुढील आठवड्यात बाजारात पांढरा कांदा विक्रीस येण्याची शक्यता आहे. पांढरा कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे.