अलिबाग : परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या अलिबागमधील पांढऱ्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे.
यामुळे यावर्षी या कांद्याची लागवड एक महिना उशिरा होणार असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. औषधी गुणधर्म असलेला पांढरा कांदा म्हणून अलिबागच्या कांद्याला ओळखले जाते.
तालुक्यात सुमारे ३०० पेक्षा अधिक एकर कांद्याचे क्षेत्र आहे. एक हजारहून अधिक शेतकरी उत्पादक आहे. चविष्ट व रुचकर अशी अलिबागच्या त्याची ओळख आहे. कार्ले, खंडाळे, वाडगाव, सागाव, तळवली, नेहुली अशा अनेक भागात लागवड केली जाते.
या उत्पादनातून लाखो रुपयांची उलाढाल होते. दरवर्षी स्थानिकांसह पर्यटक अलिबागचा तो खरेदी करण्यासाठी येत असतात. अलिबागच्या पिकाला मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यात तसेच देशात प्रचंड मागणी आहे.
महिलांना रोजगाराचे साधन
दिवाळीला पांढऱ्या कांद्याची रोपे तयार करून त्याची लागवड केली जाते. यानंतर जानेवारीमध्ये कांदा तयार होतो. दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होते. कांदा तयार झाल्यावर कांदा शेतातून काढणे, तो सुकविणे, त्याच्या माळी तयार करणे, बाजारात विक्रीसाठी पाठविणे अशी अनेक प्रकारची कामे केली जातात. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
अलिबागला वेगळी ओळख
अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे अलिबागच्या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत.
डिसेंबरमध्ये लागवड
यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. भातशेतीला पोषक असे वातावरण मिळाले आहे. परंतु, परतीच्या पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.पांढऱ्या कांद्याला त्याची झळ पोहचली असल्याची चिता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिला आहे. ओलाव्यामुळे रोपे तयार होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. रोपांची लागवड डिसेंबरमध्ये करण्यात येणार आहे.
पांढऱ्या कांद्याची रोपे तयार केली आहेत. परंतु, परतीच्या पावसामुळे प्रचंड त्रास होत आहे. रोपे पावसात खराब होऊ नये यासाठी त्यावर प्लास्टिकचे आवरण टाकले आहे. ही रोपे कुजण्याची भीतीदेखील आहे. यंदा पांढऱ्या कांद्याची लागवड एक महिना उशिरा होणार आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. - सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी