पुणे : राज्यातील साखर गाळप हंगाम जवळपास संपत आला असून राज्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर केवळ दोन साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे साखर आयुक्तालयाने अधिकृतरित्या गाळप हंगामाची सांगता जाहीर केलेली नाही. तर यंदा अपेक्षेपेक्षा जास्त उसाचे गाळप झाले असून साखरेचे उत्पादनही अधिक झाले आहे.
दरम्यान, यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यातील १०३ सहकारी आणि १०४ खासगी साखर कारखाने होते. या साखर कारखान्यांपैकी २०५ साखर कारखान्यांनी आता गाळप थांबवले असून विदर्भातील दोन साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत.
साखर आयुक्तालयाच्या ५ मे अखेरच्या गाळप अहवालानुसार राज्यातील केवळ दोन साखर कारखाने सुरू आहेत. तर या अहवालानुसार आत्तापर्यंत राज्यात १ हजार ७१ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले. त्यातून १ हजार १०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील सरासरी साखर उतारा हा १०.२६ एवढा आहे. यंदा मागच्या वर्षीपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाले असून साखर उताराही मागच्या वर्षीपेक्षा जास्त होता.
हे साखर कारखाने अजूनही सुरूच...
मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. युनिट - ४, देव्हाडा, मोहाडी ता. भंडारा हा साखर कारखाना अजून सुरू असून या साखर कारखान्याने १ लाख ७९ हजार ९० क्विंटल उसाचे गाळप केले आहे. त्यातून १ लाख ५७ हजार ९७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. येथील सरासरी साखर उतारा हा ७.७१ एवढा असून येणाऱ्या ७ ते ८ दिवसांत या कारखान्याचे गाळप थांबेल अशी शक्यता आहे.
मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. युनिट -१, बेला, ता. उमरेड हा साखर कारखानाही अजून सुरू असून या कारखान्याने आत्तापर्यंत १ लाख ७९ हजार ७१० मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ५६ हजार ३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. येथील साखर उतारा हा सर्वांत कमी म्हणजे केवळ ३.२८ एवढा आहे.