लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात चौदा साठवण तलाव असून, यातील दोन तलावात मुबलक पाणीसाठा असून, बाकीचे बारा साठवण जोत्याखाली असल्याने आगामी काळात तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून आताच उपाययोजना राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
जळकोट तालुक्यात यावर्षी केवळ ५० टक्के पाऊस झाल्यामुळे पाणीपातळीत वाढ दिसून येत नाही. यावर्षी बारा साठवण तलाव ज्योत्याखाली असून, काही दिवसात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद होणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाईची भीती आतापासून वाटू लागली आहे.
तालुक्यातील सोनवळा तलावात ४० टक्के, हाळद वाढवणा ४३, जंगमवाडी ३, डोंगरगाव ८०, माळहिप्परगा ९२, रावणकोळा ९०, सिंदगी ३७, ढोरसांगवी शून्य टक्के, चेरा एक १८ टक्के, चेरा दोन १८, हवरगा शून्य टक्के, धोंडवाडी २३ टक्के, गुत्ती एक ३०, गुत्ती दोन २१ टक्के एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.
यातील डोंगरगाव, माळहिप्परगा, रावणकोळा साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. माळहिप्परगा साठवण तलावातून जळकोट शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. या साठवण तलावात सध्या ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नियोजन करून पाणीपुरवठा झाल्यास आगामी काळात पाणीटंचाई भासणार नाही. तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा साठवण तलावातून असून, अनेक साठवण तलावाचा आता तळ दिसत असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
उपलब्ध पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे...
• पाऊसकाळ कमी झाल्यामुळे साठवण तलावात पाण्याचा साठा कमी आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी तलावावरील विद्युत मोटारी काढण्यात आल्या आहे. अनेक रोहित्रावरील लाइट बंद करण्यात आले आहे.
• साठवण तलावातील पाणीसाठा उपसा होत असल्यास मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी सांगितले.