येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून अनेक कारखान्यांनी घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संपन्न केला. या सोहळ्यात संचालकांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. काही जणांनी मागच्या गळित हंगामाचा वाढीव हफ्ता देण्याची, कामगारांना दिवाळी बोनस देण्याची, तर यावर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पहिला हफ्त्याचीही घोषणा केली आहे.
दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी भीमा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा पार पडला. त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ४०० रूपये पहिली उचल म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी केली आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील एन. व्ही. पी. शुगर कारखान्याने तब्बल २ हजार ७०० रूपये पहिला हफ्ता शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून यंदा कारखाना चालवला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचेच हित समोर ठेवून पहिला हफ्ता देण्यात येणार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं.
यंदा उसाचे क्षेत्र कमी झाले असून एकमेकांच्या क्षेत्रांतील उस नेण्यासाठी कारखान्यांची स्पर्धा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध सवलती कारखान्यांनी गाळप हंगामाच्या आधी जाहीर केल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर कामगारांना बोनस आणि साखर वाटप करण्याचीही घोषणा भिमा सहकारी साखर कारखान्याने केली आहे. तर एकाही शेतकऱ्याचा उस राहणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी घोषणाही साखर कारखान्यांनी केली आहे.
कारखाने आणि त्यांनी केलेल्या घोषणा
- भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ, सोलापूर - २ हजार ४०० रूपये पहिली उचल, कामगारांना ८.३३ टक्के बोनस आणि १५ किलो साखर मोफत देण्याची घोषणा
- एन व्ही पी शुगर प्रा. लि. धाराशिव - शेतकऱ्यांना २ हजार ७०० रूपये दर देणार असल्याची घोषणा केली
- कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना, इंदापूर - साखर उतारा ११ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची घोषणा केली
- धाराशिव साखर कारखाना युनिट -४ सांगोला - चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांसोबतच योग्य भाव देण्याची घोषणा केली
- निरा - भीमा सहकारी साखर कारखाना - या वर्षी या कारखान्याचा राज्यातील टॉप १० कारखान्यांच्या यादीत नाव असेल अशा ग्वाही दिली
- भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, आंबेगाव, पुणे - मागच्या हंगामात विक्रमी ३ हजार १०० रूपये दर दिला तर यंदा त्यापेक्षा जास्त दर देण्याची घोषणा केली
- श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा - ६ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उद्दिष्ट, एकाही शेतकऱ्यांचा उस राहणार नाही अशी घोषणा केली
- माणगंगा साखर कारखाना, आटपाडी - उस घातल्यानंतर १५ दिवसांत शेतकऱ्यांना रोखीने बील दिले जाईल अशी घोषणा केली.