Join us

अक्षय्य तृतीयेपूर्वीच चाखायला मिळणार आमरस! लालबागचा आंबा खातोय भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:21 AM

बाजारातील लालबागच्या आंब्याची आवक वाढली, ग्राहकांना मात्र गावरानची प्रतीक्षा

फकिरा देशमुख

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाला अद्याप अवधी आहे. त्यापूर्वीच केरळातील लालबागच्या आंब्याची आवक वाढायला सुरूवात झाली असून, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील बाजारात लालबागचा चांगलाच सुगंध दरवळत आहे. तसेच, केरळसह इतर भागातून ही वेगवेगळ्या जातीचे आंबे देखील बाजारात येत आहेत. हे आंबे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सध्या लालबागचा आंबा २०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शहरात गेल्या दोन दिवसांत दोन क्विंटल आंब्याची आवक झाली आहे. त्यामुळे भोकरदनवासीयांना अक्षय्य तृतीयेपूर्वीच आंब्याचा रस चाखायला मिळणार आहे.

या आंब्यांचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्याने अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सध्या छत्रपती संभाजीनगरातून मोठ्या प्रमाणात आंबे बाजारात येत आहेत. यात केरळचा लालबागचा आंबा ही आहे. हा आंबा इतर आंब्याच्या मानाने चवीला गोड आणि सुगंधाला चांगला आहे. हा आंबा डझनावर नाही, तर किलोवर विकला जातो.

जास्त करून फळांचा रस करण्यासाठी, हॉटेल व्यावसायिकांकडून या आंब्याला मागणी असते. या आंब्याचे दर सर्वांनाच परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य इतर आंब्यांना पसंती देणार आहेत. 

भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; आंबा लिंबू मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी 

ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद

• गेल्या दोन दिवसांपूर्वी केरळसह छत्रपती संभाजीनगरातून लालबागचा आंबा दाखल झाला आहे. परंतु, हा आंबा दोनशे रूपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.

• त्यामुळे शहरातील ग्राहकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेता शेख मोसीन शेख यांनी सांगितले.

काय किलो विकतोय लालबाग

केरळ राज्यातून लालबाग आंब्याची आवक झाली आहे. सध्या हा आंबा २०० रुपये किलोने विकला जात आहे. भोकरदन शहरातील बसस्थानक परिसरातील फळ विक्रेत्यांकडे हा आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून, ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

यंदा महिनाभरापूर्वी भोकरदनसह तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने गावरान आंब्यांना आलेला मोहर पूर्णतः गळून पडला होता. त्यामुळे यंदा गावरान आंबा चाखायला मिळतो की, नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, आताही मोठ्या प्रमाणात गावरान आंब्यांना पसंती दिली जाते. त्यामुळे यंदा गावरान आंब्याचे भाव तेजीत असणार आहेत. - शेख हुसेन, व्यापारी भोकरदन

केशर, बदाम, हापूस येण्यास पंधरा दिवस लागणार

आता मार्चच्या शेवटी 'लालबाग' ची आवक झाली आहे. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंबा, तर मे मध्ये गुजरातचा केशर व अखेरीस मराठवाड्यातील केशर आणि गावरान आंब्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी पंधरा दिवसांनी सर्वच आंब्यांची चव चाखायला मिळणार आहे.

टॅग्स :आंबाकेरळमराठवाडाशेतीबाजार