Join us

Amravati Rain : अमरावतीत जोरदार पाऊस, वीज, वादळाचे रौद्ररूप; वीज कोसळून तिवस्यात मजूर, मेळघाटात वृद्ध ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 2:58 PM

जिल्ह्यात शनिवारी(१९ ऑक्टोबर) पहाटेपासून दिवसभरात विजांच्या प्रचंड कडकडाटात पाऊस झाला.(Amravati Rain)

Amravati Rain :

तिवसा / चिखलदरा : जिल्ह्यात शनिवारी(१९ ऑक्टोबर) पहाटेपासून दिवसभरात विजांच्या प्रचंड कडकडाटात पाऊस झाला. तिवसा तालुक्यात एक परप्रांतीय शेतमजूर तसेच चिखलदरा तालुक्यात पशुपालकाचा वीज कोसळल्याने जीव गेला. पाच महिला मजूर गंभीर जखमी झाल्या, याशिवाय तीन म्हशी आणि सहा बकऱ्याही दगावल्या.

तिवसा तालुक्यात शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास इसापूर शिवारातील शेतातून सोयाबीन मळणीचे काम करून परतणाऱ्या मजुरांवर वीज कोसळली. यात ओजाराम अमरलाल मसराम (३५, रा. रामनगर, मध्य प्रदेश) हा मजूर जागीच दगावला, नीलम लालसिंग धुर्वे (१८), सुनीता सुजाण धुर्वे (३८), संगीता संजय मसराम (१७), रमाबाई येनूज सरपाम (१८), पूनम सुजाण धुर्वे (१०) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

तिवसा पोलिसांनी पंचनामा केला. फत्तेपूरचे माजी सरपंच संजय इंगळे व इसापूरचे पोलिस पाटील दिनेश ठाकरे यांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुनीता धुर्वे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातपाठविण्यात आले.

दुसरीकडे चिखलदरा शहरातील अप्पर प्लेटो स्थित प्रोस्पेक्ट पॉइंटनजीक वन खंड क्रमांक ४० गाविलगड परिक्षेत्रात म्हशी चारत असताना शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास वीज कोसळून तीन म्हशींसह पशुपालक गुलाब लक्ष्मण खडके (६५ रा. पांढरी) ठार झाले. वनरक्षक मुकेश जावरकर यांनी घटनास्थळी भेट दिली व संबंधित विभागांना कळविण्यात आले.

शेतात साचले पाणी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातदेखील १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील माहुली चोर परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी मोहन चोरे यांनी सांगितले.

सोयाबीन गंजी भिजल्या

शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी लावल्या आहेत. यात कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान केले. आता पहिल्या टप्प्यातील कपाशीची बोंडे फुटत असल्याने सीतादहीची तयारी शेतकरी करीत असताना पावसामुळे काही भागांतील कापूस भिजल्याने नुकसान झाले आहे.

मोबाइलचे झाले तुकडे

गुलाब खडके यांच्या हातात मोबाइल होता. बहुधा ते मोबाइलवर बोलत असल्याने वीज त्यांच्याकडे झेपावल्याचा कयास लावण्यात येत आहे. त्यांच्या हातातील मोबाइलचे तुकडे घटनास्थळी आवळून आले

पुण्यतिथी महोत्सवात पडझड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील कार्यक्रम मंडपाची पडामड झाली. व्यावसायिकांनी थाटलेली साहित्य विक्रीची दुकाने कोलमडून पडली.

वाळत ठेवलेले सोयाबीनही झाले ओले

चांदूर रेल्वे तालुक्यात १९ ऑक्टोबर सकाळी साडेसहा साडेसातच्या दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. मांजरखेड कसबा, बासलापुर, चिरोडी आदी गावांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोंगून घरी आणलेले आणि वाळण्यासाठी ठेवलेले सोयाबीन शेतकऱ्यांना ताडपत्रीने झाकावे लागले.

अमरावतीकरांना उन्हापासून दिलासा

अमरावती शहरात पहाटे साडेचारपासून अचानक विजांचा कडकडाट आणि त्यापाठोपाठ ५ पासून जोरदार पावसाने हजेरी लावली. तथापि, हा पाऊस संपूर्ण शहरभर नव्हता, सकाळी ८ पर्यंत ठिकठिकाणी पाऊस कोसळला. या पावसाने अमरावतीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

घरावर कोसळली वीज

तिवसा तालुक्यातील मोद्वारी येथे मधुकरराव उमप यांच्या घरावर चीज कोसळली. त्यामुळे त्यांच्या घराचा कोपरा खचल्याची माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसअमरावतीविदर्भपीकशेतकरी