शेतीची कामे करताना समस्या कमी व्हाव्यात, हा उद्देश समोर ठेवून बीड तालुक्यातील चौसाळा येथील सौरभ निनाळे या कृषी पदवीधारकाने एकाचवेळी सात कामे करणारे बहुपयोगी यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टर आधारित असलेल्या या बहुपयोगी यंत्राची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी पाहणी केली.
शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मजुरांची टंचाई, शेती मशागतीसाठी लागणारा वेळ, वेळेवर न होणारी शेतीची कामे, वाढती मजुरी, वाढत जाणारे शारीरिक कष्ट, मजुरांकडून होणारी अकुशल शेतीची कामे अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना सध्या करावा लागत आहे.
यावर उपाय म्हणून कृषी पदवीधारक तरुणाने वेगवेगळे प्रयोग करून ट्रॅक्टरचलित बहुपयोगी यंत्र तयार केले आहे. हे यंत्र एकाच वेळी सात प्रकारची कामे करीत असल्याची माहिती प्राप्त होताच छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी सौरभ याच्या शेतात जाऊन प्रत्यक्षरीत्या त्या यंत्राची पाहणी केली.
यावेळी अशोक लोढा, डॉ. बाबू जोगदंड, डॉ. दिलीप मोटे आदी उपस्थित होते. हे यंत्र पाहून सहसंचालकांनी सौरभ याचे कौतुक केले. हे यंत्र तयार करताना त्यांना कृषी महाविद्यालय, बदनापूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय सुपेकर, खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दीप्ती पटेगावकर, पाणी फाउंडेशनचे शिवलेश्वर मेदने, प्रगतशील शेतकरी दत्ता जाधव, श्रीकांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
नेहमी सुरु असतात नवनवीन प्रयोग
सौरभ हे कृषी पदवीधर असून, सध्या एसबीआयमध्ये नोकरीला आहेत. परभणी विद्यापीठांतर्गत असणारे कृषौ महाविद्यालय, बदनापूर येथे त्यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच असणारी शेतीची आवड आणि शास्त्रोक्त असणारा शेतीचा अभ्यास यातून हे यंत्र साध्य केले आहे. त्यांचे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सुरू असतात.त्यांनी शेतकऱ्यांचा गट स्थापन करून महाबीज सोयाबीन सीड प्लॉट, पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा आदींमध्ये सहभाग घेतला आहे.
यंत्रामध्ये सेन्सरचा वापर
● तूर. ऊस, कापूस, भाजीपाला, फळबाग आदी पिकांच्या अंतर्गत मशागतीसाठी या बहुपयोगी यंत्राचा वापर केला जाऊ शकतो.
● तसेच उगवणीपूर्व तणनाशक, उगवणीपश्चात तणनाशक फवारणी करणे, पिकाला कीटकनाशक, बुरशीनाशक टॉनिक आदींची फवारणी करणे, पिकाला एसटीपी पंपने फवारणी करणे, पिकाला द्विचिंग, रोटर करणे, पिकाला माती लावणे, सरी ओडणे, द्वीप अंधरणी करणे, खत पेरणे, विविध पिकांची पेरणी करणे अशी सात ते आठ प्रकारची कामे यंत्राद्वारे एकाच वेळी करता येतात.
● या यंत्रामुळे शेती मशागतीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. यंत्रामध्ये सेन्सरचा वापर केल्यामुळे सर्व कामांना कौशल्यता प्राप्त होऊन शेती निविष्ठांमध्ये बचत होऊ शकते. परिणामी, उत्पादन वाढीस मदत होणार आहे.