विजय मुंडे
जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होत आहे. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज, कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे.
रेशीम शेतीसाठी शासनाकडून प्रति एकर तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदानासह अंडीपुंजही दिले जातात. २०२३-२४ मध्ये रेशीम कोषाला प्रति क्विंटल ४३ हजार रुपयांचा भाव मिळाला. एक एकरात तुतीची लागवड करून ३५० अंडीपुंजाची दोन पिके घेता येतात. पहिल्या वर्षी एक लाख १२ हजारांचे उत्पन्न मिळते. दुसऱ्या वर्षी ८०० अंडीपुंजाचे संगोपन करून ४५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दोन लाख ५२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
आता रेशीम कापडही निर्मिती केली जाईल
रेशीम धागा निर्मितीच्या पुढील प्रक्रिया उद्योग ज्यात रेशीम धाग्यास पीळ देणे, रेशीम धाग्यांची रंगणी करणे, रंगणी केलेल्या रेशीम धाग्यापासून रेशीम कपडानिर्मिती करणे आदीसाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.
रेशीम कोष बाजारपेठ
रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना पूर्वी कर्नाटकात जावे लागत होते. परंतु, २०१८ सालापासून जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ सुरू झाली.
शेतकऱ्यांना जालन्यातील बाजारपेठेतच कर्नाटकचा दर मिळत आहे.