Join us

अन् पेरूच्या बागेवर घातले घाव; उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:34 IST

Guava Farming : दिवसेंदिवस पेरूच्या शेतीतून मशागतीचाही खर्चही निघत नसल्यामुळे भोकरदन तालुक्यातील संतप्त बागायतदार शेतकरी आप्पाराव देशमुख, अरुण देशमुख, सिदूसिंग डोभाळ, सुरेश तळेकर या सर्वांनी मिळून १५ एकर पेरूच्या बागेवर कुन्हाडीचा घाव घातला आहे.

फकिरा देशमुख 

दिवसेंदिवस पेरूच्या शेतीतून मशागतीचाही खर्चही निघत नसल्यामुळे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील संतप्त बागायतदार शेतकरी आप्पाराव देशमुख, अरुण देशमुख, सिदूसिंग डोभाळ, सुरेश तळेकर या सर्वांनी मिळून १५ एकर पेरूच्या बागेवर कुन्हाडीचा घाव घातला आहे.

एकाचवेळी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी घेरल्याने हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी आपल्या १५ एकर शेतांत लखनौ ४९ जातींची सुमारे हजारो झाडे लावली होती. त्याची मशागतही चांगल्या प्रकारे करण्यात आली. मात्र, कोरोनाकाळात पेरू खाण्याकडे नागिकांनी दुर्लक्ष केले.

परिणामी, बाजारपेठेत अपेक्षित भाव न मिळाल्याने ही बाग कापून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यात पिंपळगाव, रुणुकाई, इब्राहीमपूर येथील शेतकरी सिदूसिंग डोभाळ, पेरजापूरचे शेतकरी सुरेश तळेकर यांनीदेखील आपल्या शेतातील पेरूची बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

आप्पाराव देशमुख व अरूण देशमुख यांनी तीन वर्षांपूर्वी भोकरदन येथे दोन एकर शेतात लखनौ ४९ या जातीच्या पेरूची बाग लागवड केली होती. त्यावेळी सातशे पेरूची रोपं लागवडीसाठी ३ लाख खर्च आला होता. या बागेपासून वार्षिक १० लाख उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा देशमुख यांना होती. मात्र, तसे उत्पन्न मिळाले नाही.

पेरूची झाडे कापताना मजूर.

फळासोबत तोडली बाग

शासन बागायतदार शेतकऱ्यांना मदत करतो, असे आश्वासन देते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळाली नाही. लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न निघत नसल्याने शेवटी या झाडावर कुन्हाडीचे घाव घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी. - आप्पाराव देशमुख, उत्पादक शेतकरी, भोकरदन.

लॉकडाऊनमुळे पेरूच विकले नाही

• लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी शेतातील पेरू विकतच घेतले नाही. त्यामुळे पेरू झाडावरच सडले. यंदा तर बागेचा खर्च तरी निघेल असे वाटत होते.

• मात्र, परतीच्या पावसाने आलेली फळे गळून गेली आणि मोठं नुकसान झाले. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली होती;

• परंतु मदत न मिळाल्याने अखेर शेतकरी आप्पाराव देशमुख, अरुण देशमुख, सिदूसिंग डोभाळ, सुरेश तळेकर या सर्वांनी मिळून १५ एकर बागेवर कुन्हाडीचा घाव घातला आहे.

हेही वाचा : कांद्याच्या शेतीने विकासाला मिळाली उभारी; राज्यातील 'हे' गाव आज देतंय तालुक्याला टक्कर भारी

टॅग्स :बाजारफळेशेतकरीशेतीजालनामराठवाडाशेती क्षेत्र