Join us

पशुसंवर्धन विभाग सज्ज : प्रगणकांना दिले प्रशिक्षण;  किती महिन्यात होणार पशुगणना? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 5:25 PM

येत्या रविवारपासून २१ व्या पशुगणनेचे काम सुरू होणार आहे.

येत्या रविवारपासून हिंगोली जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेचे काम सुरू होणार आहे. चार महिन्यांच्या कालावधीत ही गणना पूर्ण केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण तयारी केली असून, ३० ऑगस्ट रोजी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक, प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले.

येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात शुक्रवारी (ता. ३०) जिल्ह्यातील पर्यवेक्षक, प्रगणक यांची पशुगणना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पशुसंवर्धन विभागाचे लातूर येथील प्रादेशिक सहायक आयुक्त डॉ. नाना सोनवणे, सहायक आयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी, डॉ. राजेसाहेब कल्यापुरे, डॉ. दिनेश टाकळीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, डॉ. पहूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

परदेशी यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने पशुगणनेची जोरदार तयारी केली असल्याचे सांगून पशुगणना ही १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणारआहे. 

आपला देश हा शेतीप्रधान असून, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जोड धंद्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिली पशूगणना ही १९१९ साली झाली असून, आज १०० वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले. २१ वी पशुगणना करण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहेत. त्यानुसार चार महिन्यांत पशुगणना करावी लागणार आहे. 

हिंगोली जिल्हा लहान असल्याने तीन महिन्यांतच पशुजनगणना केल्यास जिल्हा राज्यात अव्वल येऊ शकते, हे दाखवून दिले पाहिजे, त्यामुळे सर्वांनी ऊर्जेने काम करण्याच्या सूचना दिल्या, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच प्रगणकांचा देखील जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

२१ वी पशुगणना १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. या गणनेत ग्रामीण आणि शहरी भागांतील प्रत्येक कुटुंबातील सर्व प्रकारच्या पशुधनाची संख्या नोंदविणे आवश्यक आहे.

गणनेच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी विशेष ऑनलाइन प्रणालीचा मोबाइल ॲपद्वारे वापर करण्यात येणार आहे. यावेळी दोनशे पेक्षा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक सहभागी झाले असून, प्रशिक्षणार्थीना मोबाइल ॲपच्या वापराचे आणि विविध प्रगणन तंत्रज्ञानाचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ॲपवर महिती कशी भरावी, याची इत्यंभूत माहिती देण्यात आली.

पशुपालकांचे सहकार्य आवश्यक

■ या पशुगणनेच्या यशस्वीतेसाठी पशुपालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या घरातील सर्व प्रकारच्या पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांना पुरवावी.

■ ही माहिती केवळ पशुसंवर्धन विभागासाठीच नाही, तर संपूर्ण ग्रामीण विकासासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

■ त्यामुळे पशुपालकांनी प्रगणकांना योग्य माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती