Join us

गंभीर गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडून निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:38 PM

पुढील आदेश येईपर्यंत भागचंद वासुदेव वंजारी हे निलंबित राहतील असे आदेश देण्यात आलेले आहेत. 

वर्धा :  वर्धा जिल्हा परिषदेतील पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. भागचंद वासुदेव वंजारी यांना पशुसंवर्धन विभागाकडून निलंबित करण्यात आलेले आहे. त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या प्रशासकीय गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, संबंधित आरोपावरून विभागीय चौकशीची कारवाई सदर अधिकाऱ्यावर प्रस्तावित असून त्यांना शासन सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहे. तर पुढील आदेश येईपर्यंत भागचंद वासुदेव वंजारी हे निलंबित राहतील असे आदेश देण्यात आलेले आहेत. 

पशुवैद्यकीय संघटनेचे सचिवांना पत्रडॉ. भागचंद वासुदेव वंजारी यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या प्रशासकीय गैरवर्तनाचे आरोप असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे पण महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेकडून हे निलंबन मागे घेण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवांना पत्र लिहिण्यात आले आहे. गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी पत्र लिहिल्यामुळे या संघटनेच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

'कारवाई योग्यच'"सदर अधिकाऱ्याकडून आमच्या कार्यात मदत व सहकार्य मिळत नव्हते त्याच बरोबर आमच्या प्रयत्नात अडथळे निर्माण करण्याचे काम ते करत होते. त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली ही योग्य आहे" असं गौळाऊ गोवंश जतन संवर्धन संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून सांगण्यात आले व सदर कारवाई संदर्भात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवांचे आभार मानण्यात आले.

कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला आम्ही पाठीशी घालत नाहीत पण विभागात काम करणाऱ्या कोणत्याही निष्पाप अधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये म्हणून आम्ही पत्र लिहिले आहे. कोणत्याही अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाची चौकशी करून कारवाई केली पाहिजे.- रामदास गाडे (अध्यक्ष, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसाय