सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन भवन येथे पाणीटंचाई उपलब्धता नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते.
संभाव्य दुष्काळाच्या परिस्थितीमुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे व त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांची नावे पशुसंवर्धन विभागाने तात्काळ नोंदणी करून चारा डेपो सुरू करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातून पाण्याची एक पाळी सोडावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करणे व ऊस पिकाला वाचवण्यासाठी पाणी मिळण्यासाठी उजनी धरणातून पाण्याचे एक आवर्तन देण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली.