Join us

Animal Livestock census : पशुगणनेसाठी प्रगणक, पर्यवेक्षक नेमले; पण युजर आयडी व पासवर्ड मिळणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 10:50 AM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पशुगणना सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला. (Animal Livestock census)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पशुगणना सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला. परंतु, यासाठी नेमलेल्या पर्यवेक्षक आणि प्रगणकांना केंद्राकडून अद्यापही ॲपचा युजर आयडी व पासवर्ड मिळाला नसल्याने ही पशुगणना नेमकी कधीपासून सुरू होईल, याबद्दल प्रशासनही संभ्रमात पडले आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. मागील पशुगणना २०१९ मध्ये झाली होती. वास्तविक, २०१७ मध्ये पशुगणना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यासाठी दोन वर्षांचा विलंब झाला होता. 

यंदाची पशुगणना एक सप्टेंबरपासून सुरू केली जाणार असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार तयारी करण्यात आली. ग्रामीण भागासाठी दर ३ हजार कुटुंबांमागे एक, तर शहरी भागासाठी ४ हजार कुटुंबांमागे एक, असे जिल्ह्यात २५४ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय ५७ पर्यवेक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली. पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची या कामासाठी प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जि. प. आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले. 

ग्रामीण भागातील १४१६ गावे आणि तालुक्याचे ठिकाण आणि महापालिकांच्या २३१ वार्डात ही पशुगणना केली जाणार आहे. पशुगणनेसाठी पाच वर्षांपूर्वी प्रगणकांना टॅब दिले होते. त्यावर माहिती भरून घेतली होती. आता प्रगणकांना स्वतःचे मोबाइल वापरावे लागणार आहेत.  केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे.

अधिकारी म्हणतात, 'वेट अँड वॉच'

पशुगणनेसाठी नेमलेले प्रगणक व पर्यवेक्षकांची यादी व त्यांची कागदपत्रे ही केंद्रीय पशुसंवर्धन विभागाला पाठविण्यात आली आहेत. मात्र, त्यांना अद्याप युजर आयडी व पासवर्ड मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पशुगणनेचे सॉफ्टवेअरवर ओपन होणार नाही. त्यामुळे १ सप्टेंबरपासून होणारी पशुगणना आता नेमकी कधीपासून सुरू होईल, याबाबत पशुसंवर्धन विभागही संभ्रमात पडला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजना