Animal Market : कोविडच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेला निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील पशुधन बाजार पुन्हा एकदा तीन वर्षांनंतर शनिवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पशुपालकांसह व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी पशुधनाचे पूजन करून व्यवहारास सुरुवात झाली.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे बाजार समितीत असलेले मोठे गाव आहे. येथील बाजार समितीशी महाराष्ट्रातील ५९ गावांचा, तर कर्नाटकातील ५० गावांचा व्यावहारिक संबंध येतो. येथे दर शुक्रवारी भाजीपाल्याचा बाजार भरतो, तर दर शनिवारी जनावरांचा आठवडी बाजार भरत होता. मात्र, कोविडच्या संकटामुळे गेल्या तीन वर्षांपासून जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, येथील आठवडी बाजार पुन्हा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती बालाजी भंडारे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला. गावातील पशुधनाचा आठवडी बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शनिवारी आठवडी बाजारास सुरुवात झाली. येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, माजी सरपंच मोहनराव भंडारे यांच्या हस्ते गाय व बैलांची पूजा करण्यात आली. यावेळी सूर्यभान भंडारे, पोलिस उपनिरीक्षक जनार्दन काळे, बालाजी भंडारे, हाजी सराफ, अनंत भंडारे, व्यंकट गोपणे, इमाम खुरेशी, शेषरान गोपणे, सुभाषराव मुळे, व्यंकट दापके गोरख नवाडे, व्यंकट मरगणे, विलास कांबळे, विठ्ठल येडते, सैलान नाईकवाडे, नारायण पाटील, विठ्ठल पाटील, पाशा खुरेशी, ईमाम खुरेशी आदी उपस्थित होते.
दोन्ही राज्यांतील व्यापाऱ्यांचा सत्कार...जनावरांच्या बाजारात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. दोन्ही राज्यात प्रसिद्ध असलेला येथील पशुधन बाजार पुन्हा सुरू झाल्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.