Animals will get local and foreign fodder : हिंगोली जिल्हयातील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राच्या जमिनीवर यंदा कोम्बो, मुम्बासा, सुपर नेपिअर आदी विदेशी जातींच्या गवतासह देशी गवताची लागवड करण्यात येत आहे. लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांत गवत कापणीसाठी उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाच्या वळूमाता प्रक्षेत्रावर असलेल्या म्हशींसाठी बारा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध व्हावा, या दृष्टीने नियोजन केले जाते. हिंगोली, भोगाव (बिजाराम) व इसापूर येथे पशुपैदास प्रक्षेत्राची शेकडो एकर जमीन आहे. या जमिनीवर चारा घेण्यात येतो. प्रामुख्याने हिंगोली येथील प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या गवतांची लागवड करण्यात येते. यंदा पाऊस वेळेत पडल्याने इसापूर रमना भागात चाऱ्यासाठी लागणाऱ्या ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पशुंना हिरवा चारा मिळणार आहे.
सततच्या पावसाचा व्यत्यय
आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने गवत लागवडीच्या कामात व्यत्यय येऊ लागला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात इसापूर रमना भागातील जमिनीवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे, तर आता हिंगोली प्रक्षेत्रावर देशी-विदेशी गवताची लागवड केली जात आहे.
प्रक्षेत्रावर लहान-मोठ्या १८० म्हशी
हिंगोलीच्या शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रावर सध्या लहान-मोठ्या १८० म्हशी आहेत. यातील काही दुभत्या म्हशी असून, दूध विक्रीतून प्रक्षेत्राला महसूल मिळतो. या म्हशीसाठी चारा उपलब्ध व्हावा, याकरिता आता प्रक्षेत्राकडे असलेल्या जमिनीवर विविध प्रकारच्या चाऱ्याची लागवड करण्यात येत आहे.
देशीसह विदेशी गवत
हिंगोलीजवळील क्षेत्रावर सुपर नेपियर, फोर-जी बुलेट, ऑस्ट्रोनियनरेड, बांगलादेश हाफ रेड, बाहुबलीसह कोम्बो, मुम्बासा, मारवेल, पेन्सिल गवत, ऊसक्रॉस आदी देशी- विदेशी गावतांची लागवड करण्यात येत आहे. - डॉ. बाळासाहेब डाखोरे, प्रक्षेत्र व्यवस्थापक