सतीश घनमोडे
गुढीपाडवा जवळ आला असून, या सणापासून शेतकऱ्यांच्या नवीन वर्षाला प्रारंभ होतो. गुढीपाडव्यापासून नवीन सालगडी ठेवण्यात येतो. यंदा मात्र सालगडी लाखमोलाचा झाला असून, शेतकरी शोध घेत असले तरी कुणीही सालगडी म्हणून राहण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
ज्यांच्याकडे पंधरा-वीस एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती आहे त्यांना घरच्या माणसांवर शेतीचे संपूर्ण काम करणे शक्य होत नसल्याने सालगडी ठेवतात. गुढीपाडवा सणापासून सालगडी ठेवण्याची परंपरा आहे. या सणाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीसह शेती अवजारांची पूजा करून उन्हाळी मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते.
यंदा ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार असून, नववर्षारंभाला सालगडी मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून शोध घेतला जात आहे. परंतु, अलीकडच्या काळात सालगडी मिळणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागणीप्रमाणे सालाचे पैसे मोजूनही मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.
सालाचे पैसेही द्या अन् धान्यही
मागील दोन-तीन वर्षात सालगड्यासाठी वर्षाचे जवळपास ८० हजार ते एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. एवढे पैसे देऊन धान्यही द्यावे लागते. दोन्ही मिळून शेतकऱ्याला एक सालगडी जवळपास सव्वा ते दीड लाख रुपयांमध्ये पडत आहे. त्यामुळे घरची माणसे शेतात काम करणारी असतील तर शेती परवडते. अन्यथा शेती परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सालाने नको; महिन्याने काम हवे
पूर्वी शेतमजुरांकडून महिने किवा रोजंदारीला पसंती न देता सालगडी म्हणून राहण्याकडे कल असायचा. मागील पाच वर्षांत मात्र सालगडी म्हणून राहण्यास कुणीच तयार होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. शेतमजुरांना विचारणा केल्यास सालगडी म्हणून नको, महिन्याने किंवा रोजंदारीने कामाला येण्याची तयारी दाखविली जात आहे. त्यामुळे सालगडी मिळणे कठीण झाले आहे.
शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
.. कुणी कामालाच यायला तयार नाही; शेती करणे झाले अवघड
अलीकडच्या काळात कुणी शेतात कामाला यायला तयार नाही. सालगडी ठेवायचा तर तो मिळत नाही आणि मिळालाच तर एक ते सव्वा लाख रुपये मोजावे लागतात. सालगडी, मजुरी, लागवडीचा खर्च लक्षात घेतला तर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. अशा परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. - नारायणराव देशमुख, शेतकरी, पुसेगाव
उत्पादनात दरवर्षी होणारी घट, बाजारात शेतमालाचे पडते भाव यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. अशा परिस्थितीत सालगड्याला आलेला भाव, मजुरीचे वाढते दर यामुळे शेती करावी तरी कशी? असा प्रश्न पडत आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, असे वाटते. परंतु, दरवर्षी शेती तोट्याची ठरत आहे. परिणामी, शेतकरी अडचणीत येत आहेत. - जगन कापसे, शेतकरी, पुसेगाव
परजिल्ह्यातील सालगड्याचा शोध
सध्याच्या घडीला सालगडी शोधूनही परिसरात सापडत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून गावात किंवा परगावातील सालगडी पाहिला जातो. तर काही शेतकरी दुसऱ्या जिल्ह्यातून सालगडी आणण्याचे नियोजन करीत आहेत. काही वर्षापूर्वी स्वतःहून सालगडी घरी यायचे व कामासाठी ठेवा म्हणून विनवणी करायचे. जे नियमित काम करायचे तेच वर्षानुवर्षे सालगडी म्हणून राहायचे. आता मात्र सालगडी म्हणून कुणी काम करायला तयार नसल्याचे चित्र आहे.