Join us

Aple Sarkar Portal : २४ दिवसांपासून 'आपले सरकार' डाउन; उत्पन्न, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्रे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:00 AM

आपले सरकार पोर्टल व महाऑनलाइनचे सर्व्हर १ जुलैपासून डाउन आहे. त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या वतीने मुंबई आयटी विभागास पत्र लिहू लिहून तत्काळ सर्व्हर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिरीष शिंदे

आपले सरकार पोर्टल व महाऑनलाइनचे सर्व्हर १ जुलैपासून डाउन आहे. त्यामुळे बीड विभागातील उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या वतीने मुंबई आयटी विभागास पत्र लिहू लिहून तत्काळ सर्व्हर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तर शाळा महाविद्यालय सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत.

यासह नियमित प्रमाणपत्र जसे की, रहिवासी प्रमाणपत्र, इन्कम प्रमाणपत्र, वरिष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्प भूधारक प्रमाणपत्र, तात्पुरते रहिवासी प्रमाणापत्र, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यूज प्रमाणपत्र यासह इतर प्रमाणपत्रांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.

मागील २४ दिवसांपासून महाऑनलाइनचे सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. शासनस्तरावर हे पोर्टल व सर्व्हर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व्हर डाउनच होते.

कशामुळे सर्व्हर डाउन?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे सीएससी चालकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. एका केंद्र चालकाचा लॉगिन आयडी आठ ते दहा ठिकाणी एकाच वेळी चालविला जात आहे. त्यामुळे सर्व्हर डाउनची समस्या निर्माण झाली असल्याचे वरिष्ठ पातळीवरून जिल्हा प्रशासनास सांगण्यात आले आहे.

किती प्रमाणपत्रे प्रलंबित?

बीड, शिरुर व गेवराई या तीन तालुक्यातील जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचे असे जवळपास ४५०० प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. जोपर्यंत सर्व्हरचा प्रॉब्लेम निकाली निघणार नाही तोपर्यंत प्रमाणपत्रे मिळण्यास अडचणीच येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावत्या मिळण्यास विलंब

अर्जदाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास तो अर्ज सबमिट होण्यास बराच विलंब लागतो. सर्वसामान्य नागरिक लॉगिन करू शकतात; परंतु त्यांना अर्ज भरताना वारंवार अडचणी येत आहे. बहुतांश वेळा दिवसा सर्व्हरची गती कमी असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अर्जाचा भरणा केला जातो. मात्र दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीसुद्धा हीच अडचण येत आहे, अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांना मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी मंजुरीचे प्रमाणपत्र दिसत आहे.

संप सुरू, सर्व्हर बंद

■ महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने कर्मचारी कार्यालयात येत नव्हते.

■ परंतु, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या कामकाजासाठी काही कर्मचारी हजर राहत होते.

■ सर्व्हर डाउन असल्याने कार्यालयात येऊनही प्रमाणपत्रांची कामे करता आली नाहीत.

महा ऑनलाइन पोर्टलवरून प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी चार डेस्कवरून काम करण्यास मंजुरी मिळाली आहे. सर्व्हर सुरू होताच कामाला सुरुवात होणार आहे. - नरेंद्र कुलकर्णी, तहसीलदार, बीड.

हेही वाचा -  Matoshri Panand Rasta Yojana आता शेत रस्ते घेतील मोकळा श्वास; मातोश्री ग्राम समृध्दी शेत पाणंद रस्ते योजना

टॅग्स :बीडशेती क्षेत्रसरकारमराठवाडा