Join us

APMC Market : मोंढ्यातील व्यवहार होणार उद्यापासून पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 11:28 AM

APMC Market : शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार २५ जुलैपासून बंद ठेवण्यात आले होते. आता ३ ऑगस्टपासून हे व्यवहार पूर्ववत होणार आहेत.

APMC Market : हिंगोली येथील बाजार समितीचा नवा मोंढा आणि हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार २५ जुलैपासून बंद ठेवण्यात आले होते. आता ३ ऑगस्टपासून हे व्यवहार पूर्ववत होणार असून, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

मोंढ्यातील आडते, खरेदीदार यांना नाणे टंचाईचा सामना करावा लागत असल्याने काही दिवस मोंढ्यातील शेतमालाची खरेदी-विक्री बंद ठेवण्याची मागणी ग्रेन मर्चन्टस् असोसिएशनच्या वतीने बाजार समितीकडे करण्यात आली होती.

त्यानुसार २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान मोंढ्यातील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ३ ऑगस्टपासून नवा मोंढ्यातील भुसार मालाच्या खरेदी- विक्रीसह संत नामदेव मार्केट यार्डात हळदीचे व्यवहारही पूर्ववत होणार आहेत. त्यामुळे बाजार समितीतील खरेदी - विक्री व्यवहार पूर्वीसारखे होतील.  

पडत्या भावात विकावा लागला शेतमाल

आठवडाभरापासून नवा मोंढा, मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्री बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतमाल विक्री करावा लागला. या बाजारात मात्र शेतमालाची खरेदी पडत्या भावात करण्यात आल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. आता शनिवारपासून मोंढ्यात शेतमालाची खरेदी- विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी