इंदापूर द्राक्ष शेतीमध्ये विज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. केंद्राच्या शिफारशींचा काटेकोरपणे अवलंब केल्यास द्राक्ष बागायतदारांना निश्चितच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी केले.
शुक्रवारी (दि. ११) शहरातील डॉ. नितू मांडके सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पूर्व हंगामी द्राक्ष फळ छाटणी चर्चासत्रात ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी द्राक्ष काडी पक्वता, काडीमधील घडनिर्मिती, द्राक्ष छाटणी, वांझ काडी विरळणी, द्राक्षमणी विरळणी, द्राक्षमणी पक्वता, निर्यातक्षम द्राक्षाच्या गुणवत्तेचे निकष, आदी विषयांचे विस्तृत विवेचन केले. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी द्राक्षाचे प्रती एकरी उत्पादन, द्राक्षाची प्रत, उत्पादन खर्च व विक्री याबद्दल शेतकऱ्यांना व्यवस्था याबद्दल मार्गदर्शन केले.
चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी बारामती, इंदापूर व आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांसाठी लिखित स्वरूपात पाठवलेला मार्च २०१४ पर्यंतचा पावसाचा अंदाज वाचून दाखविला. सुधीर वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री वाघमोडे यांनी आभार मानले. बारामती, इंदापूर व माळशिरस भागातील शेतकरी चर्चासत्रास उपस्थित होते.
मोफत मृदा आरोग्य कार्ड बनवून देणारराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय यांनी द्राक्ष बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. द्राक्ष वेलींच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार लागणारी मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये, द्राक्ष बागांच्या अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी माती व पाणी तपासणी, पर्णदेठ तपासणीबद्दल त्यांनी माहिती दिली. इंदापूर, बारामती व माळशिरस भागातील द्राक्ष बागायतदारांसाठी मातीचे नमुने घेऊन संशोधन केंद्रामार्फत मोफत मृदा आरोग्य कार्ड बनवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.