सोलापूर जिल्ह्यातील ४१ पैकी ३७ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या ऊस गाळप हंगाम परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे किती साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळणार व प्रत्यक्षात किती साखर कारखान्यांचा भोंगा वाजणार, हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण ४१ साखर कारखाने आहेत. त्यापैकी वैराग येथील संतनाथ साखर कारखाना, नांदणी येथील लोकशक्ती साखर कारखाना व अक्कलकोटचा स्वामी समर्थ साखर कारखाना बंद अवस्थेत आहेत. करमाळ्यातील मकाई साखर कारखाना चालू अवस्थेत असला, तरी मागील वर्षाच्या 'एफआरपी'नुसार शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याने अद्याप मकाई कारखान्याने गाळपासाठी अर्ज केला नाही. म्हणजे जिल्ह्यातील ४१ पैकी ४ साखर कारखान्यांचे गाळप परवान्यासाठी अर्ज आले नाहीत. उर्वरित ३७ साखर कारखान्यांचे साखर गाळप परवान्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाला अर्ज आले आहेत.
राज्यातील साखर हंगाम सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. ही बैठक आज (गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे. कदाचित एक नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले असले तरी ऊस क्षेत्र व उसाची पुरेशी वाढ झाली नसल्याने प्रत्यक्षात किती साखर कारखाने सुरू होतील? हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार आहे.
परवान्यासाठी राज्यात २१७ अर्ज
मागील वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यावर्षी आतापर्यंत २१७ साखर कारखान्यांचे ऊस हंगाम सुरु करण्यासाठी अर्ज आले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, एकाही कारखान्याला ऊस गाळप परवाना दिला नसल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर ऊस
मागील वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यावर्षी आतापर्यंत २१७ साखर कारखान्यांचे ऊस हंगाम सुरु करण्यासाठी अर्ज आले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, एकाही कारखान्याला ऊस गाळप परवाना दिला नसल्याचे सांगण्यात आले.
आमच्याकडे जिल्ह्यातील ३७, तर उस्मानाबादच्या १३ साखर कारखान्यांचे परवान्यासाठी अर्ज आले आहेत. मंत्री समितीच्या बैठकीत गाळपाचे धोरण ठरेल. त्यानंतर परवाने मिळतील व कारखाने सुरू होतील. क्षेत्र भरपूर असले, तरी वजनात घट होण्याचा अंदाज आहे. - पांडुरंग साठे, प्रादेशिक सहसंचालक (साखर)