सांगोला : रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर, गहू १५ डिसेंबर आंबा फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २४ पर्यंत, डाळिंबासाठी १४ जानेवारी व उन्हाळी भुईमूग ३१ मार्च २५ पर्यंत पीक विमा भरण्यासाठी मुदत दिली आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आपले सरकार केंद्रावर विनामूल्य पीक विमा भरण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसाठी-२०२४-२५ या रब्बी हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँकेसह जन सुविधा केंद्रावर सीएससी केंद्रावर शेतकरी स्वतः पीक विमा ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे अर्ज, विमा हप्ता जनसुविधा केंद्रावर निःशुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची, तसेच चक्रीवादळ, वादळी पाऊस व अवेळी पावसामुळे कापणीनंतर शेतात वाळवण्याकरिता ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याबाबतची माहिती ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीसह कृषी विभाग यांना देणे आवश्यक आहे.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ऐच्छिक आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सांगोला तालुका कृषी विभागाकडून केले आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा भरताना आधार कार्ड, आधार नोंदणीची प्रत, ७/१२ उतारा, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत सादर करणे बंधनकारक आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपला बँकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक आदी बाबींची खातरजमा करावी जेणेकरून भविष्यात पीक विमा मंजूर झाल्यानंतर तक्रारी उद्भवणार नाहीत. - दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला
अधिक वाचा: Rabi Pik Vima : पिकांसाठी हजारोंचा खर्च होतोय तेवढा १ रुपयाचा पिक विमा काढा की