Join us

मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये, किती कोटींची तरतूद?

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 17, 2023 11:52 AM

कोणत्या जिल्ह्यात कृषी महाविद्यालये? निधी किती? वाचा...

मराठवाड्यात ५ नव्या कृषी महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी ५०० कोटींहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर  छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास ६० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामध्ये कृषीसाठी ७०९ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये ५ नव्या कृषी महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत ही महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.

बीडमध्ये दोन कृषी महाविद्यालये

मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे शासकीय कृषी महाविद्यालय व शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 

प्रत्येकी ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे असणारी ही महाविद्यालये परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी २४६.९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यामध्ये शासकीय कृषी महाविद्यालयासाठी 154 कोटी खर्च अपेक्षित असून यासाठी 45 शिक्षक आणि 43 शिक्षकेतर पदे निर्माण करण्यात येतील. तर शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयासाठी 132 कोटी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी 16 शिक्षक आणि 24 शिक्षकेतर पदे निर्माण करण्यात येणार आहे.

नांदेडमध्येही कृषी महाविद्यालय

नांदेड जिल्ह्यात 60 विद्यार्थी क्षमता असणारे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 146 कोटी 54 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी 45 शिक्षक आणि 43 शिक्षक पदे निर्माण करण्यात येतील. नांदेड जिल्ह्यात एकही शासकीय कृषी महाविद्यालय नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हिंगोलीत १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे कृषी महाविद्यालय

हिंगोली जिल्ह्यातही नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून 100 विद्यार्थी प्रवेशक क्षमतेचे हे महाविद्यालय असेल असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला.

सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, ठाण तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास काल मान्यता देण्यात आली.

टॅग्स :एकनाथ शिंदेशेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रमहाविद्यालयधनंजय मुंडेबीडऔरंगाबादनांदेडमराठवाडा