पुणे : भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी १ हजार २६८ भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्यात १४२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव होती. मात्र, यासाठी स्थापत्य अभियंते असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त होत्या.
आता ही पदे संबंधित प्रवर्गातून भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच वेगवेगळ्या कारणांनी राहिलेली १७४ पदे असे एकूण ३१६ पदे प्रतीक्षा यादीतून भरली जाणार आहेत.
भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या वर्षी १ हजार २६८ भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी स्थापत्य अभियंता असलेले उमेदवार पात्र असतात. या परीक्षेनंतर १ हजार १२६ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, माजी सैनिकांसाठी असलेल्या राखीव जागांवर उमेदवार मिळाले नव्हते. त्यामुळे १४२ जागा रिक्त राहिल्या होत्या.
भूकरमापक परीक्षेची निवड यादी २८ एप्रिल २०२३ रोजी जाहीर करण्यात आली होती. राज्य सरकारच्या नियमानुसार कोणतीही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरले जाते. ही निवड यादी २७ एप्रिल २०२४ ला बाद ठरणार होती.
संबंधित जातीच्या प्रवर्गातून भरणार पदे
- राज्य सरकारने प्रथम या निवड यादीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त जागा संबंधित जातीच्या प्रवर्गातून भराव्यात, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाला नुकतेच दिले आहेत. त्यानुसार आता या १४२ रिक्त जागा या प्रतीक्षा यादीतून भरल्या जाणार आहेत.
- ज्या उमेदवारांना निवड यादीतून नियुक्ती देण्यात आली अशा उमेदवारांची संख्या ९५२ असून रुजू न होणारे तसेच रुजू झाल्यानंतर अन्य ठिकाणी नियुक्त्ती मिळाल्याने राजीनामा दिलेल्यांची संख्या देखील १७४ इतकी आहे. त्यामुळे माजी सैनिकांच्या प्रवर्गातील १४२ तर रुजू न झालेल्या व राजीनामा दिलेल्या १७४ जागा अशा एकूण ३१६ जागांवर आता या प्रतीक्षा यादीतून निवड केली जाणार आहे. येत्या पंधरवड्यात जागा भरल्या जातील, असे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.